Sunil Tatkare : अर्थखात्यावर NCP ठाम, विलिनीकरणाच्या चर्चेवर तटकरेंचे मौन! मात्र कदमांच्या वक्तव्याचा दोनच शब्दात विषय संपवला; 'कोणाचेही नाव घेऊन'

Sunil Tatkare Gets Emotional in Baramati And Ramdas Kadam Statement : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत पाडव्याच्या निमित्ताने अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांसह रामदास कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय बारामतीत पाडव्याला येण्याची वेळ यंदा आल्याने मनात प्रचंड दुःख आणि वेदना आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. गेल्या तीस वर्षांपासून पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत येण्याची परंपरा राहिली आहे. या काळात बारामतीतील उसळलेला जनसागर अनुभवला. दादांची भेट तर होतच होती; त्याचबरोबर शरद पवार साहेबांची भेट घेण्याचाही योग सातत्याने येत होता. त्यामुळे दादांशिवाय बारामती आणि पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नियतीपुढे कोणाचेही चालत नाही. मात्र, बारामतीत यावे, नतमस्तक व्हावे आणि पवार कुटुंबीयांकडून पाडव्याच्या शुभेच्छा घ्याव्यात, या स्वच्छ भावनेतून आपण येथे आल्याचेही त्यांनी सांगितले.

विलिनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करण्यास नकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना तटकरे यांनी सध्या अशा वेळी कोणतेही राजकीय वक्तव्य करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. विलिनीकरणाचा मुद्दा असेल, तर पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार याच त्यासंदर्भातील निर्णय घेतील, असे ते म्हणाले. शरद पवार साहेबांना देशाच्या राजकारणातील सहा दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय त्यांचाही असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी आहे.

मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून आपण दिवाळीनिमित्त आपल्या सुतारवाडी येथे असून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारत आहोत. त्यामुळे अलीकडील राजकीय घडामोडींची आपल्याला माहिती नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या हा मुद्दाच समोर नसल्याने त्यावर भाष्य करणार नाही. आज मी भावनाप्रधान आहे. माझ्या अंतःकरणातील भावना वेगळ्या आहेत. दादांचा जीवाभावाचा सहकारी म्हणून गेली तीस वर्षे काम केले आहे. महाराष्ट्रात आज जो सुनील तटकरे आहे, तो शरद पवार साहेबांमुळे आणि अजितदादांमुळे आहे. त्यामुळे आज या विषयावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : 'उपमुख्यमंत्रिपदा'साठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केल्याचा रामदास कदमांचा संशय

अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे; तटकरे यांची ठाम भूमिका

दरम्यान, राज्याच्या अर्थखात्याबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हे खाते मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. स्वर्गीय अजित पवार यांनी राज्याला विक्रमी अर्थसंकल्प दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला २०१० मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. तो राज्याचा ५० वा अर्थसंकल्प होता. मात्र, अजितदादांनी सलग ११ अर्थसंकल्प सादर केले होते. महाराष्ट्राची आर्थिक घडण घडवण्यात आणि राज्याच्या विकासाला दिशा देण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार भेटीवर काय म्हणाले तटकरे?

१० तारखेला प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय कारण नाही. प्रत्येक राजकीय भेटीमागे राजकीय अर्थ शोधण्याची गरज नसते. राजकारणाच्या पलीकडेही काही नाती जपावी लागतात, असे ते म्हणाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वर्गीय वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांकडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नाती कशी जपायची आणि जोपासायची, हे शिकायला मिळाल्याचे तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : 'अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंची आमदारांना फोनाफोनी, हवं होतं उपमुख्यमंत्रिपद अन् अर्थखातं'; शिंदेंच्या आमदाराने राजकारण तापवले!

रामदास कदमांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार

रामदास कदम यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता तटकरे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. यासंदर्भात आपण कालच बोललो आहोत. मात्र, या पवित्र जागेचे महात्म्य कमी होईल, अशा पद्धतीने कोणाचेही नाव घेऊन प्रतिक्रिया द्यायची नाही, असे ते म्हणाले. बारामती ही आमच्यासारख्या महाराष्ट्रातील करोडो वारकऱ्यांसाठी पंढरीसारखी आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जसे करोडो वारकरी जातात, तसेच अनेक लोक बारामतीला श्रद्धेचे स्थान मानतात. शरद पवार साहेबांशी आमचे जुने नाते आहे. त्यामुळे या पवित्र ठिकाणी कोणाचे नाव घेऊन त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा या स्थानाचे महत्त्व आणि पावित्र्य जपणे मला अधिक महत्त्वाचे वाटते, असे सांगत तटकरे यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.