Shivsena Politics; Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Shivsena UBT Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; नेमकं कारण काय?

Police Notice To Vaibhav Naik : सिंधुदुर्गमध्ये आंबा आणि काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी 23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पण आता त्याआधीच पोलिस अलर्ट मोडवर आले असून आंदोलनातील काही महत्वाच्या नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Aslam Shanedivan

  1. आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीसाठी 23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

  2. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

  3. वैभव नाईक यांनी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

Sindhudurg News : ‘पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने आम्ही भुरळून जाणार नाही. दिलेले आश्वासन १० दिवसांत शासकीय आदेशात रुपांतरित झाले नाही, तर २३ मार्चला नांदगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन केले जाईल,’ असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला आक्रोश मोर्चादरम्यान दिला होता. तर सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार आणि व्यापारी महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो बागायतदारांनी मोर्चा काढला होता.

यानंतर आता सोमवारी (ता.२३) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस अलर्ट मोडवर आले असून आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून त्यांनी सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप केला आहे.

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील बागायतदार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून मदतीचा हात मिळावा, यासाठी गेले काही दिवस मागणी सुरू आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला. ज्यात जिल्ह्यातील हजारो बागायतदार सहभागी झाले. यावेळी मुख्यालयात पालकमंत्री नीतेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मोर्चाला सामोरे गेले.

शेट्टी आणि पालकमंत्री यांच्यात चर्चा झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यात ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवल्याची माहिती दिली. तर सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही दिली. मात्र शेट्टी यांनी यावेळी ‘आपल्याला केवळ मोर्चा काढून थांबायचे नाही, तर मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे स्पष्ट केले. तसेच पुढील १० दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २३ मार्चला सकाळी १० वाजता नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला.

तर या आंदोलनाला येताना शेतीच्या वाटेने या आणि सोबत भाकरी बांधून आणा. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर रात्री रस्त्यावरच जेवण बनवू. महामार्गावर एक मुंगीही इकडून-तिकडे जाणार नाही, अशा पद्धतीने चक्काजाम करू असा इशारा दिला होता. तसेच या काळात बँका कर्ज वसुलीसाठी आल्या तर त्यांच्या गाड्या जाळल्या जातील. आताची ही लढाई ‘करेंगे या मरेंगे’ अशी आहे,’ असा आक्रमक पवित्रा शेट्टी यांनी घेतला होता.

आता या इशाऱ्यास ९ दिवस होत असून उद्या (सोमवारी) नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पण आता त्याच्याधीच या आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. अशीच नोटिस ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना देखील बजावण्यात आली आहे. ज्यात जिल्ह्यात 3 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच या कालावधीत आंदोलनादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य कृती किंवा चिथावणीखोर वक्तव्य केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी संबंधीत व्यक्तिची राहील असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान आता पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्याने आंबा, काजू बागायतदरामध्ये नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. यावरूनच सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच त्यांनी अशा कितीही नोटीसा आल्यातरी उद्याचा रास्ता रोको होणारच असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

त्यांनी, शेतकऱ्यांना काढलेल्या नोटिसा म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून सोमवारी होणारा रास्ता रोको कोणालाही त्रास न होता शांततेत निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रास्ता रोको असून अशा नोटीसा काढून हा मोर्चा कोणीही थांबू शकणार नाही. मात्र कोणी दडपशाहीचा प्रकार केला तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असाही इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

FAQs :

1. आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे?
आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी.

2. आंदोलन कधी आणि कुठे होणार आहे?
23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

3. कोणत्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे?
राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

4. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
नेते आणि कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

5. वैभव नाईक यांनी काय आरोप केला आहे?
सरकार आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT