Bhimashankar Wildlife Sanctuary : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरानजीकच्या सायडोंगर भागात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी 32 हजारांहून अधिक झाडे तोडली जात असल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे. सरकार (Government) आपल्या अधिकारांचा वापर करून झाडांची चोरी करत आहे. सरकारचा विकण्याचा व्यवसाय सुरू असून, जनतेची दिशाभूल करण्यात हे सरकार माहीर आहे, असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 28 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे जाऊन वृक्षतोडीच्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार, 27 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सायंकाळी उशिरा भीमाशंकर परिसरात पोहोचून मुक्काम करणार आहेत. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी सकाळी घटनास्थळी जाऊन दुपारी 12 वाजेपर्यंत वृक्षतोडीबाबतची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. स्थानिक लोकांमध्ये तीव्र आक्रोश आहे. निसर्ग वाचला पाहिजे. पाऊस कमी पडतो, ऑक्सिजनही स्वच्छ मिळत नाही आणि अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. गावकऱ्यांचाही या वृक्षतोडीला विरोध आहे. महाराष्ट्रातूनही विरोध होत आहे. स्थानिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.”
प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने होत असलेल्या वृक्षतोडीवरून जरांगे पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. वृक्षतोड रोखण्यासाठी सरकारकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली.
मंत्रिपदाचा आणि सरकारी अधिकारांचा गैरवापर करून विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करायची, हा सरकारचा एक प्रकारचा व्यवसाय झाला आहे. झाडे तोडल्यानंतर पुन्हा वृक्षारोपण केले जात नाही. 20 कोटी, 30 कोटी झाडे लावण्याच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात झाडे लावली जात नाहीत. सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. सरकारमध्ये हे खूप भयंकर सुरू आहे, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
सायडोंगर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणीय प्रश्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधासोबतच विविध राजकीय नेत्यांनीही या विषयात लक्ष घातल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळत आहे. आता जरांगे पाटील यांच्या नियोजित पाहणीनंतर या प्रकरणात आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि वृक्षतोडीबाबत प्रशासन कोणती भूमिका घेईल, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.