म्हसळा नगरपंचायतीत पक्षांतरामुळे ७ नगरसेवक अपात्र ठरल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
२७ एप्रिलपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
raigad local politics : म्हसळा नगरपंचायतीच्या सत्तेवरून महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्यंतरी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची असणारी सत्ता उलथवून लावत शिवसेनेनं सत्ता स्थापन केली होती. तर या सत्तापालटाचा बदला घेत राष्ट्रवादीने फुटलेल्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. यामुळे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता. आता याच म्हसळा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा येथे राजकीय रणकंदन होणार आहे. तर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदावर कोण बाजी मारतो हे पाहावं लागणार आहे.
म्हसळा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी जावळे यांनी निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया आज सोमवार (ता.२७) पासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे काम मुख्याधिकारी म्हसळा नगरपंचायत यांच्याकडे नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार २७ एप्रिल २०२६ सोमवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर २८ एप्रिल रोजी दुपारी २ नंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी पिठासीन अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. फेटाळण्यात नामनिर्देशनांची आलेल्या यादी व कारणे २९ एप्रिल बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहेत.
याविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी ३० एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वैध नामनिर्देशनांची यादी ०४ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. उमेद वारी मागे घेण्यासाठी ५ मे मंगळवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत वेळ दिला असून अंतिम उमेदवारांची वर्णानुक्रमे यादी ६ मे बुधवार रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जाहीर होणार आहे.
दरम्यान अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष पद निवडणूक विशेष सभा ७ मे २०२६ गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत दुपारी १२.०५ नंतर निवडणूक लढविणाऱ्या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखवली जातील. त्यानंतर दुपारी १२.१० पासून अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडून तत्काळ निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
म्हसळा नगर पंचायत मध्ये एक हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना चार महिन्यापूर्वी नगराध्यक्षासह अन्य सहा नगर सेवकांनी शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करून मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता स्थापन केली. चार वर्ष आगोदर म्हसळा नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, काँग्रेस पक्ष २ आणि शिवसेना २ असे एकूण १७नगरसेवक निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ पैकी ७नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने आणि त्यांना गट स्थापन करता न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले. पुन्हा येथे प्रभारी नगराध्यक्ष पदाची नेमणूक करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडे नगरसेवक पद रद्द बातल ठरल्याने सदस्यांनी राज्याच्या नगर विकास कार्यालयाकडे अपील दाखल करून दाद मागितली आहे. या प्रकरणाची तातडीने सुनावणी नव्याने नगराध्यक्ष निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिवशी सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
1. म्हसळा नगरपंचायत निवडणूक कधी सुरू झाली?
२७ एप्रिल २०२६ पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे.
2. नगरसेवक अपात्र का ठरले?
पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
3. सध्या म्हसळ्यात कोणाची सत्ता आहे?
शिवसेना (शिंदे गट) सत्तेत असून त्यांनी नगराध्यक्षासह सत्ता स्थापन केली होती.
4. निवडणुकीतील पुढील टप्पा काय आहे?
२८ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे.
5. या निवडणुकीचे महत्त्व काय आहे?
ही निवडणूक स्थानिक सत्तासंतुलन बदलू शकते आणि आगामी राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.