

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले असले तरी बहुमताअभावी सत्ता स्थापन अवघड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि काही ठिकाणी ठाकरे गटासोबत युती केली आहे. भाजपनेही दोन अंकी आकडा गाठला आहे.
सत्ता स्थापनेवरून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी परस्परविरोधी दावे केले आहेत.
raigad News : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर १५ पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारली आहे. सर्वात मोठा पक्ष शिंदेंची शिवसेना ठरला असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भाजप असून चौथ्या स्थानी ठाकरेंची शिवसेना आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.
याबाबत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा करताच आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सूनील तटकरे यांनी गुगली टाकत भाजप आपल्या सोबत येईल असे म्हटले आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर सत्तास्थापने आधीच येथील शिवसेना-राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून गोगावले आणि तटकरे आमनेसामने आले आहेत. तर किंगमेकर ठरलेला भाजप कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ तर १५ पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी सर्वाधिक २१ उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, शिवसेना ठाकरे गटाचे ५ तर काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. तर पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी सर्वाधिक ३७ जांगावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. त्याखालोखाल भाजपचे ३४ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३१ सदस्य निवडून आले. तर शिवसेना ठाकरे गटाचे १३ तर शेकापचे तीन उमेदवार निवडून आले.
असे राजकीय बलाबल झाले असून सर्वात मोठा ठरलेला शिवसेनेला मात्र जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. याला महायुतीतील विसंवाद आणि वाद कारणीभूत असून गोगावले-तटकरे वादाची किनार असल्याचे आता समोर येत आहे. कर्जत खालापूरचा अपवाद सोडला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती केली होती.
यामुळे जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र राहतील असे संकेतच तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसह गोगावलेंची चांगलीच कोंडी झाली आहे. पण ही कोंडी फोडतानाच गोगावले यांनीही भाजप आमच्या सोबत येईल असा विश्वास व्यक्त करत सत्ता स्थापनेकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.
याचवेळी तटकरे यांनी भाजप आणि आमची निवडणूकपूर्व यूती असून आम्हीच सत्ता स्थापन करु. आम्ही यूती केलेल्या जागांपैकी 37 जागा निवडूण आलेल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला आम्हीला कोणतीही अडचण नाही. यामुळेच जिल्हा परिषदेत आम्ही सत्तास्थापन करु असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
पण आता जिल्हा परिषद निकालानंतर सत्तास्थापनेवरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून किंगमेकर ठरलेला भाजप कोणत्या मित्रपक्षाला झुकतेमाप देणार याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच-पाच पंचायत समित्या मिळाल्या असून महाड, पोलादपूर, माणगाव, अलिबाग, मुरुड या पंचायत समिती शिवसेनेकडे गेल्या आहेत. येथे शिवसेनेचे बहुमत असल्याने सभापती, उप सभापती शिवसेनेचा असेल.
तर रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहूमत मिळाले आहे. यामुळे येथे राष्ट्रवादीचा सभापती होईल. याचवेळी पेण, पनवेल, खालापूर, सुधागड येथे भाजपने सत्ता ताब्यात घेतली आहे. यामुळे भाजपचा सभापती होणार असून एकमेव उरण पंचायत समिती महाविकास आघाडीला मिळाली आहे.
1. रायगड जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा कुणाला मिळाल्या?
शिवसेनेच्या (शिंदे गट) २१ उमेदवार विजयी झाले आहेत.
2. राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा जिंकल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ उमेदवार निवडून आले आहेत.
3. भाजपची भूमिका काय आहे?
भाजप १५ जागांसह किंगमेकरच्या भूमिकेत असून सत्ता स्थापनेत निर्णायक ठरू शकते.
4. सत्ता स्थापनेबाबत भरत गोगावले काय म्हणाले?
भाजप आमच्या सोबत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
5. सुनील तटकरे यांचा सत्ता स्थापनेवर काय दावा आहे?
भाजपसोबत निवडणूकपूर्व युती असल्याने राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.