BJP Sarkarnama
कोकण

Political Crime : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत राडा; नागरिक, पत्रकारांना मारहाणीच्या आरोपावरून १६ भाजप नगरसेवकांविरोधात गुन्हा

Case Filed Against BJP Corporators : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत चित्रीकरणाच्या मुद्द्यावरू भाजपच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली होती.

Aslam Shanedivan

Mira Bhayandar News : ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत मोबाईलवरून चित्रीकरण करण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मोठा गोंधळ उडाला होता. या वेळी नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की तसेच मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवक आणि नगरसेविकांवर करण्यात आला होता.

या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पत्रकारांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली होती. या प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चित्रीकरणावरून महासभेत गोंधळ

मिरा-भाईंदर महापालिकेची महासभा शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) पार पडली. यावेळी सभागृहातील काही जण मोबाईलवरून चित्रीकरण करत असल्याचा संशय महापौर डिंपल मेहता यांना आला. त्यांनी चित्रीकरणावर आक्षेप घेत ते थांबविण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही चित्रीकरण सुरू असल्याच्या मुद्द्यावरून सभागृहातील वातावरण तापले. हे चित्रीकरण नियमबाह्य असल्याचे सांगत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही महापौरांनी पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. तसेच कारवाई होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

नागरिक आणि पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाणीचा आरोप

या वादानंतर भाजपचे काही नगरसेवक आणि नगरसेविका नागरिक तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे गेले. मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली आणि अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या गोंधळादरम्यान काही नगरसेवकांनी नगरसेविकांच्या दिशेने चपला भिरकावल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे सभागृहातील तणाव आणखी वाढला.

या गोंधळात भाजपच्या काही नगरसेवकांनी नागरिक आणि पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप पत्रकारांनी केला. या घटनेनंतर पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली. पत्रकारांनी महापालिका सभागृहाबाहेर धरणे आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदविला आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

१६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी मारहाण झाल्याचा आरोप करणारे करण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिस ठाण्यात शनिवारी (१७ ऑक्टोबर) भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महासभेत पत्रकारांनाही मारहाण झाल्याचा आरोप असल्याने संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली होती. यासंदर्भात शनिवारी सायंकाळी पत्रकारांच्या प्रतिनिधींनी पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांची भेट घेतली.

गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे

करण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शानू गोहील, तरुण शर्मा, रुपाली मोदी, प्रीती जैन, वंदना भावसार, हेतल परमार, विशाल पाटील, संजय थरथरे, नवीन सिंग, कविता त्रिपाठी, दीपिका अरोरा, महेश म्हात्रे, भरत कोठारी, हेमा बेलानी, योगिता शर्मा आणि मनीष पराशर या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT