Rajan Salvi  Sarkarnama
कोकण

ठाकरेंना आणखी एक धक्का : आमदार राजन साळवी साथ सोडणार; शिंदे गटात प्रवेशाचे संकेत!

आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यातून त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असून तो कोकणातून (Konkan) असण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन ठाकरे यांची डोकेदुःखी वाढवली आहे. (MLA Rajan Salvi will join the Eknath Shinde group)

आमदार राजन साळवी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच राजन साळवी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही साळवी यांनी फडणवीस यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदारांबरोबरच १२ खासदारांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. त्या धक्क्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने शिवसेना नेतृत्वापुढील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान आमदार राजन साळवी यांनी नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या बैठकीनंतर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले जात आहे. एकीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये वाद पेटलेला असतानाच शिवसेनेचा आणखी आमदार शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत किती आमदार राहतील, याची चर्चा रंगली आहे.

बंडानंतर उद्धव ठाकरे हे सावरत असतानाच मुख्यमंत्री शिंदे त्यांना पुन्हा झटके देत आहेत. शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्हाबाबातचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, शिंदे अद्यापही थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाहेत. ठाकरेंकडे असलेल्या १५ आमदारांपैकीही काही आमदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT