Yogesh Kadam - Ramdas Kadam Latest News
Yogesh Kadam - Ramdas Kadam Latest News Sarkarnama
कोकण

'राजीनामा दिला असतांना हकालपट्टी करणं हस्यास्पद'

सरकारनामा ब्यूरो

Yogesh Kadam : राजीनामा दिला असतांना हकालपट्टी करणं हे हस्यास्पद आहे. पक्षाचा पोरखेळ केल्याच हे उत्तम उदाहरणं आहे,अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपूत्र आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली आहे. त्यांनी आज (ता.19 जुलै) एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. (Yogesh Kadam - Ramdas Kadam Latest News)

शिवसेनेचे (Shivsena) नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर आमदार योगेश कदमांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, एकदा राजीनामा दिला असतांना हकालपट्टी करणं हे हस्यास्पद आहे. पक्षाचा पोरखेळ सुरू केल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. रामदास कदम आणि अडसुळ यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना शिवसेनेचे नेतेपदच मान्य नव्हत आणि बाळासाहेबांनतर या पदाला काही अर्थ उरला नाही, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, तरी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना राजीनामा देत असतांना वेदना होत होत्या. हे त्यांच्या पत्रामधून दिसत आहे. मात्र, 40 आमदार, 14 खासदारांनी अन् शेकडो नगरसेवकांनी पक्ष सोडला तरी पक्षप्रमुखांना फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जवळचे वाटत आहेत, अशी खोचक टीका कदमांनी पक्ष नेतृत्वावर केली आहे.

2019 ला महाविकास आघाडीसोबत जाण्याची भूमिका पक्षाला घातक ठरली. माझ्या मतदारसंघात तरी खेड्यापाड्यातील शिवसैनिकांना ही पटली नव्हती हे मी सांगू शकतो. ही आघाडी झाल्यावर राज्यात कदाचित मी पहिलाच आमदार होतो की मी राष्ट्रवादीसोबत जुळवून घेणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते.

गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली जात होती. निधी वाटप करत असतांना पालकमंत्री अनिल परबांकडून त्यांना पाच-पाच कोटीचा निधी दिला जात होता आणि दुसरीकडे माझा पराभव करण्याची योजना होती. तर माझ्या मतदारसंघातील विकासकामाचे भूमिपुजन हे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते होत होते. तर त्या पाटीवर माजी आमदारांचे नाव होते मात्र माझे नाव नव्हते, अशी खंत कदमांनी बोलून दाखवली.

याबरोबरच दोपोली नगरपंचायत निवडणूकीत मला बाजूला केलं गेल. तर माजी आमदारांकडे सूत्र दिली जात होती. तेव्हा मला चार तिकिटापुरता निर्णय घेण्याचा अधिकार दिला मात्र, त्याबाबतही मला माहिती नव्हती. यावेळी मी माझ्या सर्वात जवळ असलेले आणि मित्र आदित्य ठाकरेंना फोन केला. मात्र त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांनी माझी बाजू ऐकली नाही याच दु:ख असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (ShivSena) एक-एक धक्का बसत आहे. खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. त्यातच शिंदे यांनी शिवसेनेची नवी कार्यकारीनीही जाहीर केली असून शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT