Aditya Thackeray in Dapoli Sarkarnama
कोकण

आदित्य ठाकरेंसमोरच खदखद बाहेर; कदम समर्थक आक्रमक झाल्यानं वातावरण तापलं

परिवहन मंत्री अनिल परब आणि आमदार योगेश कदम यांच्या शीतयुध्दाचे पडसाद कोकणात उमटत असून त्याची झलक ठाकरेंसमोरच पहायला मिळाली.

सरकारनामा ब्युरो

दापोली : कोकणच्या दौऱ्याववर असलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासमोरच बुधवारी शिवसेनेतील (Shiv Sena) खदखद बाहेर आली. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि आमदार योगेश कदम यांच्या शीतयुध्दाचे पडसाद कोकणात (Kokan) उमटत असून त्याची झलक ठाकरेंसमोरच पहायला मिळाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी कदम समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दापोली येथे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. हा पुतळ्याची उभारणी दापोली नगर पंचायतीच्या माध्यमातून होत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत योगेश कदम (Yogesh kadam) यांना डावलण्यात आल्याचा आरोप कदम समर्थकांकडून केला जात आहे. तसेच मंगळवारी रात्रीही नावाच्या फलकावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

त्याचेच पडसाद बुधवारी आदित्य ठाकरे यांच्यासमोरही उमटले. आदित्य ठाकरे कार्यक्रमाच्याठिकाणी व्यासपीठावर येताच कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. योगेश कदम आगे बढो, अशा घोषणा देताना समर्थक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. त्यावरून काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कदम यांनी परब आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना शह देण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.

काय आहे वाद?

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण काही महिन्यांपूर्वी उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश यांना साई़डलाईन करण्यात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते.

योगेश यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे दळवी यांच्या गटाच्या पदाधिकार्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. निवडणुकीवेळी कदम यांनीही शिवसेनेतील काही नेत्यांवर थेट निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला काही नेते मदत करत असल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे परब यांच्यावर निशाणा साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT