MNS BJP clash Sarkarnama
कोकण

MNS BJP clash : मनसेच्या शिर्केंना 14 दिवसांची कोठडी; भाजपच्या 2 नगरसेवकांसह 7 जणांवरही गुन्हा

MNS Chief in Custody, Seven BJP Leaders Booked in Ambarnath Clash : खासगी गाळ्याच्या ताब्यावरून सुरू झालेल्या वादात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे; कारवाईनंतर मनसेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यावरील नियोजित मोर्चा रद्द केला.

Pradeep Pendhare

Ambarnath politics : खासगी गाळ्याच्या ताब्यावरून सुरू झालेल्या मनसे आणि भाजपमधील वादाला आता कायदेशीर लढाईचे स्वरूप आले आहे. मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असतानाच, भाजपच्या दोन नगरसेवकांसह सात जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर मनसेने आज पोलिस ठाण्यावर काढण्याची घोषणा केलेला मोर्चा रद्द केला आहे.

अंबरनाथमध्ये भाजप (BJP) कार्यालय असलेल्या एका खासगी गाळ्याच्या ताब्यावरून 11 ऑगस्टच्या रात्री मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. हा वाद केवळ शाब्दिक चकमकीपुरता मर्यादित राहिला नाही. पोलिस ठाण्याच्या आवारातही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांच्या वाहनाची तोडफोड करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणात सुरुवातीला मनसेचे (MNS) शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती. शिर्के यांना आता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मोर्चापूर्वीच पोलिसांनी भाजप शहराध्यक्ष आणि नगरसेवक अभिजीत करंजुले, नगरसेवक पवन वाळेकर यांच्यासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

महिलांशी गैरवर्तनाचा आरोप

भाजपकडून या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या कार्यालयात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या बैठकीदरम्यान शैलेश शिर्के आणि त्यांचे सहकारी तेथे आले. त्यानंतर वाद निर्माण झाला. या घटनेत महिलांशी गैरवर्तन झाल्याचा तसेच लक्ष्मी चव्हाण आणि संतोष शिंदे यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचा मनसेवर गंभीर आरोप

भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या नगरसेवकांना अटक

भाजपच्या दोन नगरसेवकांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने नियोजित मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने गाळ्याच्या ताब्यावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर पोहोचला आहे.

राजकीय आखाडा मनसे गाजवणार

मनसे आणि भाजपमधील या संघर्षाचा पुढील टप्पा कायदेशीर प्रक्रियेतून ठरणार असला, तरी अंबरनाथच्या राजकीय आखाड्यात दोन्ही पक्षांतील संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT