

By, विनायक दरंदले, नेवासा, अहिल्यानगर
Ahilyanagar political news : अहिल्यानगहरच्या जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या भेटीची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडाख यांच्या अहिल्यानगर येथील ‘विरंगुळा’ निवासस्थानी भेट देत स्नेहभोजन केले. या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाखही (Shankarrao Gadakh) उपस्थित होते. त्यामुळे पक्षीय सीमारेषा ओलांडून झालेल्या या भेटीमागे केवळ कौटुंबिक स्नेह आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून संभाव्य विजयी उमेदवार, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रभावशाली नेत्यांशी संपर्क वाढविला जात असल्याची चर्चा आहे.
प्रा. राम शिंदे यांनी मागील काही दिवसांत जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. विशेषतः निवडणुकीत प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्तींशी त्यांनी संवाद साधल्याची चर्चा आहे. अशातच प्रा. शिंदे आणि यशवंतराव गडाख यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यापाठोपाठ आता विखे पितापुत्रांनी गडाख परिवाराची घेतलेली भेट चर्चेचा नवा विषय ठरली आहे. त्यामुळे ‘काय होणार, कसे होणार आणि हे जुळणार का?’ असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
विखे आणि गडाख कुटुंबांमधील राजकीय संबंधांना संघर्ष आणि सहकार्य, असे दोन्ही पैलू आहेत. 1991 च्या लोकसभा निवडणुकीनंतर गडाख आणि दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील निवडणूक वादाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली होती. निवडणूक निकालाला आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयीन लढाई रंगली. या संघर्षामुळे दोन्ही बाजूंच्या राजकीय संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, या उक्तीचा प्रत्यय पुढील काळातही आला.
1997 च्या विधानपरिषद निवडणुकीत गडाख यांच्या राजकीय लढतीत विखे पाटील यांनी मदतीची भूमिका घेतल्याचा इतिहासही सांगितला जातो. म्हणजेच, निवडणुकीच्या रणांगणात संघर्ष असला तरी गरजेनुसार राजकीय समीकरणे बदलण्याची परंपरा या दोन कुटुंबांच्या राजकीय प्रवासातही दिसून आली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय विरोधकांमध्येही संवाद वाढताना दिसत आहे. व्यासपीठांवर आणि निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीकेची झोड उठविणारे नेते सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मात्र वेगळी गणिते मांडताना दिसतात. प्रा. राम शिंदे-यशवंतराव गडाख यांची भेट आणि त्यानंतर विखे पितापुत्रांची ‘विरंगुळा’वरील उपस्थिती या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या भेटींमधून जिल्हा बँक निवडणुकीसाठी एखादे नवे समीकरण आकाराला येणार का, याची उत्सुकता आता वाढली आहे.
या भेटीबाबत गडाख परिवाराकडून ती कौटुंबिक असल्याचे सांगण्यात आले आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही यशवंतराव गडाख हे ज्येष्ठ नेते आणि नातेवाईक असल्याने भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय विरोधक असलो तरी कौटुंबिक पातळीवर कोणताही विरोध नसल्याचे सांगत त्यांनी नेवासे तालुक्यातील निवडणुकांबाबतही भूमिका स्पष्ट केली. नेवासेतील निवडणुका आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखालीच लढल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र, राजकारणात प्रत्येक भेटीला राजकीय अर्थ असतो आणि प्रत्येक स्नेहभोजनामागे निवडणुकीचे गणित नसतेच, असेही नाही. त्यामुळे प्रा. राम शिंदे आणि गडाख यांच्या भेटीनंतर विखे पितापुत्रांची ‘विरंगुळा’वरील भेट ही केवळ कौटुंबिक स्नेहमिलन ठरणार की जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरणार, याचे उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.