Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar  Sarkarnama
कोकण

मनसेला मोठा धक्का; राज्यातील पहिल्या नगराध्यक्षांना एकनाथ शिंदेंनी ठरवलं अपात्र

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) कोकणात मोठा धक्का बसला आहे. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा सक्रीय झालेले असताना महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारच्या नगरविकास खात्याने दणका दिला आहे. मनसेचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष ठरलेले व कोकणातील मोठे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्यावर सहा वर्षांच्या अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. नगरविकास खात्याचे मंत्री हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असल्याने आता पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) विरूध्द मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत खेडेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेचे ते नगराध्यक्ष होते. बुधवारी (ता. 7) एकनाथ शिंदे यांनी कारवाईचा आदेश काढला आहे. त्यामुळे आता त्यांनी आगामी निवडणुका लढवता येणार नाहीत. कोकणातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याशी सुरू असलेल्या वादामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खेडेकर यांनी कदमांवर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले होते.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, 1965 चे कलम 55 ब मधील तरतुदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षांचा कालावधी संपेपर्यंत खेडेकर यांना नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. गजनेते प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर व अन्य सात नगरसेवकांनी खेडेकर यांची तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. खेडेकर नगराध्यक्ष असताना ही तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीवर नगरविकास मंत्र्यांसमोर 11 नोव्हेंबर 2021 रोजी व्हिड़ीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणी झाली होती. त्यानंतर आता कारवाईचा आदेश काढण्यात आला. खेडेकर यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे, तरतुदी व आपल्यासमोर आलेली कागदपत्रे पाहिली असता खेडेकर यांच्यावरली सर्व दोषारोप सिध्द होतात, असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

खेडेकर यांच्याकडून जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन झाले आहे. हे उल्लंघन गैरवर्तणूक तसेच नियमांची हयगय करणे या सदरात मोडत असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. खेड नगरपरिषदेचा कार्यकाळ दि. 28 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आला असून प्रशासकपती उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खेडेकर हे सध्या नगराध्यक्षपदी कार्यरत नाही. त्यामुळे 1965 च्या अधिनियमातील अधिकारांचा वापर करून हे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

खेडेकरांवर कोणते आरोप आहेत?

- देयके प्रदान करताना नमुना क्र. 64 वर एकट्याने स्वाक्षरी केली

- - लेखाधिकारी यांनी तपासणी केला नसतानाही रकमा प्रदान केल्या

- - स्वत:च्या खाजगी वाहनात नगरपरिषदेच्या खर्चाने इंधन भरणे

- - बिगरशेती परवानगी न घेता बांधकाम करणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT