डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावरील देसाई खाडीवर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलावर गर्डर टाकण्याचे काम शनिवारी (ता. १६) रात्री हाती घेण्यात आले. गर्डर टाकण्याच्या सोहळ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभही झाला. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नेहमीच एकमेकांना आव्हान देणारे आमदार-खासदार आमने-सामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. (MNS MLA Raju Patil's entry in Shiv Sena MP Shrikant Shinde's program)
लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. शनिवारी रात्री ११ वाजता खासदार शिंदे यांच्या हस्ते या कामाचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी राजेश कदम, राजेश मोरे, एकनाथ पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार शिंदे आणि आमदार राजू पाटील हे या कार्यक्रमात एकत्र आल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. या दोघांनीही यावेळी कामाबाबत चर्चा केली.
डोंबिवलीत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि मनसेला व्हिडीओ व मिम्स बनवत राहण्याचे आवाहन दिले होते. तसेच, लवकरच एका कामाचा शुभारंभ होणार आहे, त्याचेही मिम्स बनवा, असा खोचक टोमणाही मारला होता. त्यानंतर शनिवारच्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी एन्ट्री घेतल्याने त्यांना काय सूचित करायचे आहे, याबद्दल कार्यकर्ते आपापसात कुजबुजत होते.
दरम्यान, देसाई पुलावर १२ सिमेंटचे गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. ता. २० ऑक्टोबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी कल्याण फाटा ते कल्याण दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. कल्याण फाट्याहून-कल्याणकडे जाणारी जड-अवजड वाहने मुंब्रा बायपास मार्गे वळविण्यात आली आहेत. कल्याणहून कल्याण फाट्याकडे जाणारी जड-अवजड वाहने बदलापूर चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसीमार्गे जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.