PM Modi Sarkarnama
कोकण

PM Modi : नौदल दिनाच्या कार्यक्रमातील भाषणातही मोदींनी जोडला 'पॉलिटिकल अँगल', म्हणाले...

Navy Day News : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले? ; नौदलाबाबत महत्त्वाची घोषणाही केली.

Mayur Ratnaparkhe

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील तारकर्ली येथे नौदल दिनाचा कार्यक्रम सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. तत्पूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यानंतर नौदल दिनाच्या कार्यक्रम ठिकाणी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काल निवडणुक निकालाचा संदर्भही दिल्याचे दिसून आले. खरंतर हा एक शासकीय कार्यक्रम होता, परंतु तरीही मोदींनी भाषणात राजकीय अँगल जोडल्याने यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ''आजचा भारत आपल्यासाठी मोठी लक्ष्य निश्चित करत आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपली संपूर्ण ताकदही लावत आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताकडे १४० कोटी भारतीयांच्या विश्वासाची ताकद आहे. ही ताकद जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मजबुतीची आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर ''काल तुम्ही देशातील चार राज्यांमध्ये याच ताकदीची झलक पाहिली. देशाने पाहिले की जेव्हा लोकांचे संकल्प जुडतात, जेव्हा लोकांच्या भावना जुडतात, जेव्हा लोकांच्या आकांक्षा जुडतात तेव्हा किती सकारात्मक परिणाम समोर येतात. विविध राज्यांच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत, त्यांच्या आवश्यकता भिन्न आहेत. परंतु सगळ्या राज्यांचे लोक राष्ट्रप्रथम या भावनेने ओतप्रोत आहेत. देश आहे तर आपण आहोत, देश पुढे गेला तरच आपण पुढे जाऊ. हीच भावना आज प्रत्येक नागरिकाचा मनात आहे.'' असं मोदींनी यावेळी सांगितलं.

याशिवाय, ''आज देश इतिहासातून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्याचा रोडमॅप तयार करण्यात लागला आहे. लोकांना नकारात्मकतेच्या राजकारणाला हरवून, प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा निश्चय केला आहे. हाच निश्चय आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल. हाच निश्चय देशाचा तो गौरव परत मिळवून देईल, ज्याचा हा देश सदैव हक्कदार आहे.'' असं मोदी म्हणाले.

तत्पूर्वी भाषणाच्या सुरुवातीस मोदी म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं, की कोणत्याही देशासासाठी समुद्री सामर्थ्य किती गरजेचं असतं. ते म्हणायचे जो समुद्रावर नियंत्रण राखतो तोच सर्वशक्तिमान आहे. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली होती. मी आज नौसेना दिनी देशाच्या पराक्रमी योद्धांना नमन करतो.''

भारत गुलामगिरीची मानसिकता मागे सोडून, पुढे जात आहे -

तसेच ''छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन आज भारत गुलामगिरीची मानसिकता मागे सोडून, पुढे जात आहे. मला आनंद आहे की आपले नौदल अधिकारी जे अपोलेक्स परिधान करतात, आता त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाची झलकही पाहायला मिळणार आहे. नवीन अपोलेक्सही आता शिवरायांच्या नौसेनेच्या प्रतीकाप्रमाणेच असतील. हे माझे भाग्य आहे की नौदलच्या ध्वजाला मला मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता अपोलेक्स मध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब आपल्या सर्वांना दिसेल.'' असं मोदींनी सांगितलं.

नौदल आता रँक्सचे नामकरण भारतीय परंपरेच्या अनुरुप करणार -

याशिवाय ''आपल्या वारशावरील अभिमानाच्या भावनेसह मला एक आणखी घोषणा करताना गर्व होत आहे, भारतीय नौदल आता आपल्या रँक्सचे नामकरण भारतीय परंपरेच्या अनुरुप करणार आहे. आपण सशस्त्र दलात नारी शक्तीची संख्या वाढवण्यावरही जोर देत आहोत. मी नौदलाचे अभिनंदन करेल की तुम्ही नेव्हल शीपमध्ये देशातील पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती केली आहे.'' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नौदलाचं कौतुकही केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT