Karjat railway bridges credit controversy; Shrirang Barne and Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Mahayuti Clash : 'माझ्या कामाची पद्धत माहिती नसेल, तुमच्यापेक्षा मी सिनियर’ : बारणेंनी डिवचल्यानंतरही तटकरेंचा संयमाचा पवित्रा

Shrirang Barne Sunil Tatkare Political Clash : रायगडमधील कर्जतच्या उड्डाणपुलांवरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले असून, महायुतीमधील नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि तणाव अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद अधिकच वाढत चालला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी आता खांद्याला खांदा लावून करेक्ट कार्यक्रम सुरू करू, असा इशारा खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. तोच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील तटकरेंवर निशाणा साधत डिवचले आहे. कर्जतमधील रेल्वे पुलांच्या कामावरून त्यांनी तटकरेंवर तोफ डागत, ‘माझ्या कामाची पद्धत त्यांना माहिती नसेल, त्यांच्यापेक्षा मी सिनियर’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नेत्यांमधील मतभेद आणि तणाव अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

रायगडच्या कर्जतमधील रेल्वे पुलांच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. कर्जत चारफाटा आणि गुंडगे-आकुर्ले उड्डाणपुलांना मंजुरी मिळाल्याचा दावा तटकरे समर्थकांनी केला असून, याबाबत शहरभर बॅनरबाजी करण्यात आली होती. यावरून आता वाद सुरू झाला असून, याला शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभात जोरदार आक्षेप घेतला.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या कामांचा आढावा घेतला. यानंतर कर्जत चारफाटा आणि गुंडगे-आकुर्ले उड्डाणपुलांना मंजुरी मिळाल्याचा दावा तटकरे समर्थकांनी करत, संपूर्ण कर्जतमध्ये बॅनरबाजी केली. ज्यावर भर कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 'रडीचा डाव' खेळत असल्याचा आरोप करत नाराजी बोलून दाखवली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या या दाव्यावर पलटवार करत तटकरेंवर निशाणा साधला. त्यांनी, मी कोणाच्याही कामाचं श्रेय घेत नाही, असं स्पष्ट करत महारेलच्या कामाची पद्धत समजावून सांगितली. त्यांनी, तटकरेंना कदाचित कामाची पद्धत माहिती नसेल, पण लोकसभेत मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे. तर गोगावले यांनी तटकरेंना ही कामाची पद्धत समजावून सांगावी आणि चुकीचा भ्रम पसरवू नये, असा सल्लाही दिला आहे. तसेच, त्यांनी आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका आणि दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नदेखील करू नका, अशा शब्दांत तटकरेंना बजावले आहे.

यानंतर टीकेनंतर तटकरे काय भूमिका घेतात? कोणतं उत्तर देतात? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतानाच तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर तटकरेंनी संयमाची भूमिका घेत, श्रीरंग बारणे आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत. आप्पा बारणे हे माझे मित्र असून, ते माझ्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतील, असं मला वाटत नाही, असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच, त्यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्या असून, राजकीय कुरघोड्यांना लगाम घाला आणि विकासकामांवर लक्ष द्या, असा टोला देखील शिंदेंच्या नेत्यांना लगावला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेला हा वाद भविष्यात आणखी रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT