nilesh rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला देऊ शकतात ‘फाइट’

Nilesh Rane : नीलेश राणे यांनी भाजपत प्रवेश केला होता. मात्र, सक्रिय राजकारणापासून ते दूर होते. आता शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार असून विधानसभेच्या रणांगणात उतरू शकतात.

Akshay Sabale

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार नीलेश राणे हे शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश करणार आहेत. बुधवारी ( 23 ऑक्टोबर ) ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते कुडाळ येथे प्रवेश करणार आहेत. नीलेश राणे यांना आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून ( शिंदे गट ) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. तर, नीतेश राणे हे भाजपमधून आमदार आहेत. नीलेश राणे हेही भाजपत काम करत होते. मात्र, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

नीलेश राणे ( Nilesh Rane ) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “2019 मध्ये आम्ही भाजपत प्रवेश केला होता. भाजपत आम्हाला खूप सन्मान मिळाला. भाजपमध्ये काम करण्याची शिस्त मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. अडचणीतून आम्हाला बाहेर काढण्यास मदत केली. पक्षात स्थान दिलं. रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळलं.”

“बुधवारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेशाची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून आम्हाला 27 हजारांचं मताधिक्य मिळालं. 90 टक्के ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, कृषी सोसायटीवर आमची सत्ता आहे. त्यासह लोकसभेलाही आमचा खासदार निवडून आला आहे. महायुतीत आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या. विधानसभाही आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

“नारायण राणे यांची सुरूवात ज्या पक्षातून आणि ज्या चिन्हावरून झाली, मला त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मला मिळणार आहे. याचं आनंद आणि समाधान आहे,” असं नीलेश राणे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT