Rane Family, Nilesh Rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : कणकवलीत राणे बंधूंमध्ये सत्तासंघर्ष टोकाला! नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर निलेश राणेंचा युटर्न; म्हणाले, कोठून आणलात हे शब्द?

Power Struggle in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या असून ठाकरेंवर सतत टीका करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शहर विकासा आघाडीच्या प्रचाराला सुरूवात केला आहे.

Aslam Shanedivan

  1. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आली, ज्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

  2. या युतीमुळे नारायण राणे – नितेश राणे विरुद्ध नीलेश राणे असा नवा सत्तासंघर्ष उभा राहिला आहे.

  3. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ झाला असून नीलेश राणे यांनी ते वक्तव्य ऐकले नसल्याचा दावा करत पत्रकारांवर संताप व्यक्त केला.

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कट्टर राजकीय वैरी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता एकत्र आली आहेत. फक्त एकत्रच आली नाही तर भाजपलाच थेट आव्हान निर्माण केलं आहे. येथे युती झाल्याने आता खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरूद्ध नीलेश राणे असा सत्तासंघर्ष तयार झाला आहे. पण आता नारायण राणेंच्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू झाला असून नीलेश राणे यांनी मात्र आपण त्यांचे हे वक्तव्य ऐकलेच नाही, असे म्हणत थेट पत्रकारांवरच रोष व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या असून माजी आमदार वैभव नाईक, माजी शहराध्यक्ष संदेश पारकर यांनी “शहर विकास आघाडी” या नावाने आघाडी बनवली. तसेच भाजपला रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं देखील सहकार्य करावे आणि आघाडीत सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. ज्यानंतर माजी आमदार राजन तेली यांनी सहमती दर्शवली होती. ज्यानंतर येथे वाद निर्माण झाला होता.

तळकोकणातील या घडामोडीमुळे मुंबईतील राजकारण ढवळून निघाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वत: माजी आमदार वैभव नाईक, माजी शहराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह इतर नेत्यांशी मातोश्रीवर चर्चा केली होती. तसेच गद्दार गटाशी कोणतीच युती होणार नाही असे आदेश दिले होते. तर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिंदेंच्या शिवसेना थेट इशारा दिला होता.

त्यांनी, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेत सिंधुदुर्गमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास दोन्ही जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असे म्हटले होते. तर विशाल परब आणि राजन तेली यांना आपण मानत नाही, माझा त्यांना नेहमी विरोध असेल. राजन तेली तर प्रतिष्ठित नागरिकात बसतच नाही. सर्वांनी टाकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतोय? माहित नाही, पण भेटले की याबद्दल विचारणार असल्याचेही ते म्हणाले होते.

दरम्यान आता निलेश राणे यांनी यावरून प्रतिक्रिया दिली असून नारायण राणेंनी तसे वक्तव्य केलेच नाही असा पवित्रा घेतला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून निलेश राणे यांनी, मी तुमच्या मताशी सहमत नाही. राणे साहेबांचे असे कुठेही स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही. उलट राणे साहेबांना सांगूनच, त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही या शहर विकास आघाडी सहभागी झालो आहोत. त्यामुळे ते असे बोलेले नाहीत.

आम्ही आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेब आणि राणे साहेब त्यांच्या परवानगीने, त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेऊनच या आघाडीच सहभागी झालो आहोत. लपून-छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहित नाही. पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं तेवढं देणारच.

संदेश पारकर जेथे बोलवतील तेथे माझ्यासह आमचे सगळे लोक जाणार. संदेश पारकर यांच्या रुपाने सिंधुदुर्गच जिंकणारच. आता समोर कोण आहे याचा विचार करू नका, अशा शब्दात आपल्या भावना निलेश राणे यांनी व्यक्त करत दंड थोपाटले आहेत.

FAQs :

1. दोन्ही शिवसेना गट का एकत्र आले?

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

2. युतीमुळे कोणता नवा संघर्ष निर्माण झाला?

खासदार नारायण राणे आणि नितेश राणे विरुद्ध नीलेश राणे असा एक नवा सत्तासंघर्ष उभा राहिला आहे.

3. नारायण राणेंच्या कोणत्या वक्तव्यावरून वाद झाला?

सिंधुदुर्गमध्ये दोन्ही शिवसेना गट एकत्र आल्यास, ते शिंदे गटाशी संबंध तोडतील असे वक्तव्य चर्चेत आले.

4. नीलेश राणे यांची भूमिका काय होती?

नीलेश राणे यांनी ते वक्तव्य ऐकलेच नाही, असे सांगत पत्रकारांवरच नाराजी व्यक्त केली.

5. यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण कसे झाले?

सिंधुदुर्गात नव्या युतीमुळे आणि राणे कुटुंबातील तणावामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT