Navi Mumbai : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची चर्चा सुरू असतानाच, याच कारवाईचा धसका दाखवून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या बोगस अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे.
स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकांना छापेमारी आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळणाऱ्या या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ६६ हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवर मनसेचा झेंडाही लावण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेल्फेअर कमिटीची बनावट ओळखपत्रे होती. गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांची माहिती मिळवून ही टोळी त्यांना लक्ष्य करत होती. FDA अधिकारी असल्याचे सांगत संबंधित दुकानदारांवर छापे टाकण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात होती. कारवाई टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींकडून खंडणी उकळली जात होती.
४ नोव्हेंबर रोजी कोपरी येथील पानटपरी चालक अभिलाष पांडे यांना या टोळीने लक्ष्य केले. FDA असल्याची बतावणी करत आरोपींनी त्यांच्या घराची तपासणी केली. त्यानंतर त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवून कोपरी आणि कोपरखैरणे परिसरात फिरवण्यात आले. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईलमधून १ लाख ८६ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नीकडून ८० हजार रुपये घेतले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण २ लाख ६६ हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी प्रशांत शिंदे, सत्येंद्र रस्तोगी, अथर्व भोसले, प्रथमेश गायकर, अंकुश पवार आणि उमेश कोडग या सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी काही जण रिक्षाचालक, टॅटू आर्टिस्ट, पेट्रोल पंप कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी आणि बसचालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ६६ हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली आहे.
सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे आणि पैसे उकळण्याचा हा प्रकार उघड झाल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. FDA अधिकाऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बोगस कारवायांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.