Maharashtra Recruitment News : भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील (NMMC) 132 पदांसाठी मंगळवार आणि बुधवारी होणारी सरळ सेवा भरती परीक्षा ऐनवेळी स्थगित करण्यात आली.
परीक्षा केंद्रांची तयारी, प्रवेशपत्रांचे वितरण आणि प्रशासकीय यंत्रणेची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने राज्यभरातून आलेल्या 18 हजार 930 उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या गट अ, गट ब आणि गट क या संवर्गांतील एकूण 132 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र नवी मुंबईतील स्थानिक युवक आणि प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागणीवरून सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला.
सत्ताधारी भाजपचे (BJP) सभागृह नेते सागर नाईक यांनी विशेष लक्षवेधी सूचना मांडत भरती प्रक्रियेवर स्थगन प्रस्ताव सादर केला. राज्यभरातील उमेदवारांसाठी भरती खुली ठेवल्यास स्थानिक युवकांवर अन्याय होईल, असा मुद्दा उपस्थित करत सेवा भरती नियमावलीत बदल करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिकांना आरक्षण किंवा प्राधान्य देण्याबाबत नवीन नियमावली तयार होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या टप्प्यावर भरती प्रक्रिया थांबवल्यास त्याचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात, अशी सूचना सभागृहाला दिली. त्यांनी सांगितले की, परीक्षा घेण्यासाठी प्रशासन, पोलिस आणि परीक्षा यंत्रणेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महापालिका ही निमसरकारी संस्था असल्याने भरती प्रक्रिया केवळ नवी मुंबईपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. या टप्प्यावर परीक्षा रद्द किंवा स्थगित केल्यास न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांच्या सूचनेनंतरही लोकप्रतिनिधींनी स्थगन प्रस्तावावर ठाम भूमिका कायम ठेवली. त्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाला नवीन सेवा भरती नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भरती प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक अनिश्चित झाले आहे.
या भरती परीक्षेसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे यांसह राज्यातील विविध भागांतून हजारो उमेदवार नवी मुंबईत दाखल झाले होते. अनेकांनी प्रवास, निवास आणि इतर खर्च करून परीक्षा केंद्रावर जाण्याची तयारी केली होती.
परीक्षा स्थगित झाल्याची माहिती शेवटच्या क्षणी मिळाल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्णय घ्यायचाच होता, तर तो आधी का घेतला नाही? परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या आदल्या दिवशी भरती प्रक्रिया स्थगित करणे म्हणजे उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ असल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.