Nilesh Rane  Sarkarnama
कोकण

Nilesh Rane News: निलेश राणेंचा ठाकरेंना मोठा दणका; कोकणातले चार डझन शिलेदार फोडले, वैभव नाईकांना धक्का !

सरकारनामा ब्यूरो

संभाजी थोरात

Kudal Political News: कुडाळ तालुक्यात भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांमध्ये कुडाळ शहर, आंबडपाल, पणदूर आणि वेताळ बांबर्डे येथील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वैभव नाईक हा विषय आमच्यासाठी संपला असून तो आमचा स्पर्धकच नसल्याची टीका निलेश राणे यांनी केली.

"सिंधुदुर्गात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याची संख्या वाढत असून यापुढे सुद्धा मोठे धक्के विरोधकांना मिळतील. शिंदे - फडणवीस सरकारने विकासाचा झपाटा लावला असून त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील २०- २० वर्षे जे कार्यकर्ते अन्य पक्षात होते ते आज भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजपमध्ये आपली विकासकामे १०० टक्के होतात असा विश्वासही अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना बसू लागला आहे. उद्धव ठाकरे गटावरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. ९ वर्षात स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी केवळ आश्वासने दिली. मात्र, नागरिकांची कोणतीच कामे झाली नाहीत. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. आगामी काळात अजून मोठे धमाके होणार आहेत", असे निलेश राणे यावेळी बोलतांना म्हणाले.

२०१४ आणि २०१९ मधील निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे आमदार आणि खासदारांना जिंकता आल्या होत्या. तर २०१९ मध्ये वैभव नाईक यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार होता. त्यावेळी अपक्ष उमेदवार रणजीत देसाई हे केवळ १० ते १२ हजार या मतांनी मागे पडलेत. म्हणजेच २०१९ मध्ये वैभव नाईक हरले होते, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

वैभव नाईक यांना नशिबाने आमदारकी मिळाली, जनतेचा विश्वास नाईक यांच्यावर कधीच नव्हता. वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघ ओसाड केला, अशी खरमरीत टीकाही निलेश राणे यांनी केली. वैभव नाईक हा विषय आपल्यासाठी संपला असून आमची स्पर्धा वैभव नाईक यांच्याशी नाही; आता आमची स्पर्धा आमच्याशीच आहे, निलेश राणे म्हणाले.

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, माजी सरपंच रोहिणी चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू कुंभार तसेच आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, पंचायत सदस्य अभय जाधव, दृष्टी सावंत आणि पणदूर येथील युवासेना कार्यकर्ते ओंकार सावंत आणि कुडाळचे माजी नगरसेवक सुनील बांदेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी युवा नेते विशाल परब, संध्या तेरसे, कुडाळ तालुका अध्यक्ष साईल संजय वेंगुर्लेकर, दीपक नारकर, सावंत बंड्या, सावंत प्रकाश मोर्ये, संजू परब, विनायक राणे, राजन परब, मोहन सावंत, दीप्ती पडते, रुपेश कानडे, मंगेश चव्हाण, पप्या तवटे, गजानन वेंगुर्लेकर, निलेश तेंडुलकर, चांदणी कांबळी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Edited by : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT