Nitesh Rane, Aditya Thackeray
Nitesh Rane, Aditya Thackeray sarkarnama
कोकण

नाणार रिफायनरीला शिवसेनेचा हिरवा कंदिल का? : नितेश राणेंनी दिले उत्तर

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : कोकणातील रिफायनरी प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत नसेल तर तो प्रकल्प जाऊ देणार नाही, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले होते. यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच बारसू सोलगावला जाण्याची शक्यता आहे. त्यावरुन आता वाद रंगला आहे. भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेची (Shivsena) भूमिका नेहमीच बदलत असते. त्यांनी जी जागा देऊ केली ती बारसूची आहे. मात्र, नाणार गाव वगळून रिफायनरी करावी ही आमची भूमिका आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) सोडून तिथे कोणाचा विरोध नाही. राऊत यांना तिथे काडीची किंमत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

जिथे वाद नाही तीथे नाणार गाव वगळून ग्रीन रिफायनरी होणार, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. रिफायनरी प्रकरणाची दखल केंद्र सरकार घेईल. ग्रीन रिफायनरी कुठे करायची हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. राज्य सरकारचे फक्त जमीन देण्याचे काम आहे. शिवसेनेने यू टर्न घेतला त्याला, सातबारावर असलेली नाव जबाबदार आहेत. शिवसेनेला दुस-याच्या मुलाचे बारसे करण्याची सवयच असल्याचे राणे म्हणाले.

ग्रीन रिफायनरी इथे होणार होती, मात्र शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला. आता रिफायनरीसाठी समर्थन वाढत आहे, म्हणून यांची भूमिका बदलली. त्यामध्ये काहितरी गौडबंगाल असल्यामुळेच शिवसेना ग्रीन रिफायनरी साठी बारसू सोलगावचे नाव पुढे करत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहील असेल, असा दावा त्यांनी केला.

आदित्य ठाकरे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावर विचारले असता राणे म्हणाले, त्यांच्या दौऱ्याचा त्यांच्या पक्षाला किती फायदा होईल हे येणाऱ्या काळात कळेल. यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, यासाठी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी ठरवा केला. त्यावरही राणे यांनी भाष्य केले, ते म्हणाले, युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे ही मागणी घरच्यांनीच केली. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT