Nitesh Rane demand for Konkan Bhavan in Mumbai 2026 Sarkarnama
कोकण

Nitesh Rane : ठाकरेंना डिवचणाऱ्या नितेश राणेंची मागणी भाजप महापौर मान्य करणार का? पत्र धाडत म्हणाले...

Nitesh Rane's letter to Mayor Ritu Tawde full details: मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर कोकणवासियांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Aslam Shanedivan

  1. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्याची मागणी केली आहे.

  2. ही मागणी त्यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना पत्राद्वारे केली असून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनही केले आहे.

  3. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील कोकणवासीयांचे मुंबईच्या विकासातील ऐतिहासिक योगदान त्यांनी अधोरेखित केले आहे.

Konkan Bhavan Mumbai : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर महापालिकेचा झेंडा फडकवला असून तब्बल 44 वर्षांनंतर भाजपने महापौरपद आपल्याकडे खेचून आणले आहे.

यामुळे सध्या राज्यातील भाजपमध्ये उत्साह वाढला असून राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणवासियांसाठी मोठी मागणी केली आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे असा प्रस्ताव नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे पाठवत मागणी केली आहे. तसेच महापौर पदावर निवड झाल्याबद्दल नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात, मुंबईच्या जडण घडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणाचा वाटा आणि योगदान असल्याचे म्हटलं आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी यासाठी मोठे योगदान दिलं आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान आता तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईचे महापौरपद आपल्याकडे खेचून आणत महायुतीचीही सत्ता आणली आहे. यानंतर आतातरी कोकणवासियांच्या ‘कोकण भवना’चे स्वप्न पूर्ण होणार का? महापौर रितू तावडे मंत्री नितेश राणे यांची मागणी मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे. कारण याआधी अनेकदा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना त्यांनी कोकणासाठी काय केलं असा सवाल उपस्थित केला होता. पण आता राज्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेवर देखील त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. यामुळे त्यांच्या पक्षाचे महापौर ‘कोकण भवना’स मान्यता देतान का हे पाहावं लागणार आहे.

FAQs :

1. कोकण भवनाची मागणी कोणी केली आहे?
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे.

2. कोकण भवन कुठे उभारण्याची मागणी आहे?
मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी कोकण भवन उभारण्याची मागणी आहे.

3. महापौर कोण आहेत ज्यांना पत्र पाठवण्यात आले?
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

4. कोकणातील कोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

5. कोकण भवनाचा उद्देश काय आहे?
मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी प्रतिनिधिक व सांस्कृतिक केंद्र उभारणे हा मुख्य उद्देश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT