Israel Farmers Land Scam Sarkarnama
कोकण

Israel Farmers Land Scam : इस्राईलमध्ये मृत शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवले; 47 गुंठे जमीन विकून 2.29 कोटींची फसवणूक, पाच जण अटकेत

Five arrested for selling deceased Israel-based farmers' land using forged documents in Panvel : पनवेल पोलिसांची मोठी कारवाई; बनावट आधार, पॅन कार्डसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त, संघटित जमीन फसवणूक रॅकेटचा तपास सुरू

Pradeep Pendhare

Panvel Land Fraud : इस्राईलमध्ये अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या दोन शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवत त्यांच्या नावावरील करंजाडे येथील 47 गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकून तब्बल 2 कोटी 29 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज शिंदे, सतीश शिंदे, तेजस सुर्वे, मनीष मोरे आणि वासुदेव शिंदे यांचा समावेश आहे. गुन्हा (Crime) दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी सूरज शिंदे कुटुंबासह फरार झाला होता. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ठिकाणे बदलत तो पोलिसांना चकवा देत होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस (Police) निरीक्षक सचिन पोवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे गोव्यातील थिविम येथे छापा टाकला. या कारवाईत सूरज शिंदे, सतीश शिंदे आणि तेजस सुर्वे यांना ताब्यात घेण्यात आले. तर, मनीष मोरे याला कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आणि वासुदेव शिंदे याला डोंबिवलीजवळील शिरढोण येथून अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच उरण पोलिस ठाण्यातही या आरोपींविरोधात अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही टोळी जमीन व्यवहारातील संघटित फसवणूक रॅकेटचा भाग असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

नेमके प्रकरण काय?

करंजाडे येथील 47 गुंठे जमिनीचे मूळ मालक नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम एलियाहू चिंचोलकर यांचे अनुक्रमे 2011 आणि 2016 मध्ये इस्राईलमध्ये निधन झाले होते. त्यांचे वारस परदेशात वास्तव्यास असल्याचा फायदा घेत मुख्य आरोपी सूरज शिंदे याने स्वतःच्या वडिलांना आणि मेव्हण्याला मृत शेतकऱ्यांच्या नावाने उभे केले.

बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड

त्यानंतर त्यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रे तयार करण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन व्यवहार पूर्ण करण्यात आला. या व्यवहारातून सीबीडी बेलापूरमधील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांच्याकडून 2 कोटी 29 लाख 50 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT