Jayant Patil Sarkarnama
कोकण

जयंत पाटलांची ‘एबी फाॅर्म’ घेऊन जायची ऑफर..!

पेण राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायचं आहे; असंच काम करा अन्‌ एबी फॉर्म घेऊन जा : जयंत पाटील

सरकारनामा ब्यूरो

पेण : ‘‘पेण (Pen) विधानसभा मतदारसंघ आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) घड्याळाच्या चिन्हावर लढवायचा आहे. तुम्ही तुमचं काम यापुढेही असंच चालू ठेवावे, तुमची प्रगती अशीच चांगली राहिली, तर माझ्याकडून एबी फॉर्म घेऊन जा,’’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पेणमधील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार्ज केले. (Pen constituency to contest on NCP clock symbol : Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज (ता. १२ एप्रिल) पेण विधानसभा मतदारसंघात पोचली. त्यावेळी या मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. सुमारे २०० मतदारसंघांचा दौरा पूर्ण करून आज पेण येथे परिवाराशी संवाद साधण्यासाठी पोचल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. कार्यकर्ता हाच पक्षाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी हा दौरा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्याबरोबरच रायगड जिल्ह्यातही शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पेण विधानसभा मतदारसंघ लढवत नसतानाही पक्ष टिकवण्याचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे, त्याबद्दल पेणमधील कार्यकर्त्यांचे कौतुक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, गेल्या २२ वर्षांत आपण पेणमध्ये अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली नाही. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये पेण, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांनी भरभरून मतदान केले आणि माझा विजय झाला. आज पेण तालुक्यातील खारेपाटणच्या पिण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खासदार म्हणून निवडून आल्यापासून हा प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जयंत पाटील यांनी मदत करावी, अशी विनंतीही तटकरे यांनी केली.

इथला शेतकरी फार मेहनतीने काम करतो, फळभाज्या पिकवून रस्त्यावर विकतो. आपल्याला या लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पेण तालुक्यातील २२ ते २३ गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच आहेत. आपल्याला अधिक चांगले काम करून पक्ष इथे बळकट करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जर वेळेवर झाल्या असत्या, तर राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते. मात्र, निवडणूक कधीही होवोत राष्ट्रवादीच एक नंबरवर राहणार आहे, असा विश्वासही खासदार तटकरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT