Narayan Rane-Nitesh Rane Sarkarnama 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा बँक 'राणेमय' : बाळासाहेबांसह शरद पवार, सोनिया गांधींचे फोटो गायब

Sindhudurg Dcc bank Election : आता फक्त गणपती आणि नारायण राणे असे दोनच फोटो

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक पॅनेलने ११ जागा जिंकत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला गेला. खुद्द अजित पवार यांनीही कोकणात येवून बँकेसाठी प्रचार केला होता, मात्र एवढं करूनही भाजपने निवडणुकीत बाजी मारली.

त्यानंतर नुकतीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही निवड पार पडली. अध्यक्षपदी भाजपचे (BJP) मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या सगळ्या घडामोडींनंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील राजकारण संपेल अशी शक्यता वाटत होती. मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक संपुर्णपणे 'राणेमय' झाल्याच दिसून येत आहे. बँकेत भाजपची सत्ता येताच अध्यक्ष दालनातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत.

अध्यक्ष दलानातील खुर्चीमागील भिंतीवर मागच्या अनेक दिवसांपासून गणपतीच्या फोटो बरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे फोटो होते. मात्र अध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर हे फोटो या भिंतीवरून गायब झाले आहेत. त्याठिकाणी आता फक्त गणपती आणि नारायण राणे असे दोनच फोटो आहेत. जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून या फोटोच्या राजकाणाची चर्चा रंगली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येण्यासोबतच काही धक्कादायक निकाल लागले आहेत. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात राजन तेलींना पराभूत करून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. आमदार वैभव नाईक यांनीच विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT