Shivsena Welcome Banner
Shivsena Welcome Banner Sarkarnama
कोकण

आदित्य ठाकरेंच्या स्वागत बॅनरवर झळकले शिंदे समर्थक आणि गुन्हेगारांचे फोटो!

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : युवा सेनेचे (yuva sena) प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शुक्रवारी (ता. १६ सप्टेंबर) रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. काही बॅनरवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या फोटोंच्या गर्दीमध्ये शिंदे गटाच्या (Eknath shinde) समर्थकांचे फोटो लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आम्ही सर्व सेनेत असल्याचे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा शिंदे गटाच्या समर्थकांनी केला आहे. शिवसेनेचा हा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न असणार आहे. (Photos of Shinde supporters and criminals appeared on Aditya Thackeray's welcome banner)

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे संवाद निष्ठायात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत येत आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत त्यांची सभा होणार आहे. रत्नागिरीमध्ये सभा भव्य करण्याचा आणि शक्तीप्रदर्शनाचा चंग सेनेने बांधला आहे. त्यासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतून सुमारे १५ हजार कार्यकर्ते दाखल होतील, असा दावा शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी केला आहे.

साळवी स्टॉप येथील जलतरण तलावासमोर ही सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर गट, गणनिहाय कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्या ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर झळकले आहेत; परंतु त्यापैकी काही बॅनरवरून जोरदार राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेकडून त्यापैकी एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर असणाऱ्या शिंदे समर्थकांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. हा बॅनर सेनेकडूनच लावण्यात आल्याचा खुलास तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. या बॅनरवर रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील, जितू शेट्ये आणि नायर यांचे फोटो आहेत. मात्र, हे सर्वजण उदय सामंत समर्थक असल्याचा दावा रोशन फाळके यांनी केला आहे. या बॅनरमुळे सेनेने उसने अवसान आण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

स्वागत बॅनरवर झळकलेले गुन्हेगारांचे फोटो काही तासांत गायब स्थान

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात हुरळून जाऊन स्वागत बॅनर लावताना त्यामध्ये गंभीर चूक केल्याचे निदर्शनास आहे. पत्नीच्या खुनाचा गंभीर आरोप असल्याचे प्रकरण ताजे असतानाही शिवसेनेचे रत्नागिरी उपतालुकाप्रमुख सुकांत उर्फ भाई सावंत यांचा फोटो या स्वागत बॅनरवर घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय राजशिष्टाचाराचे भान ठेवले नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान शिवसेना अडचणीत येण्याच्या शक्यतेने अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुकांत उर्फ भाई सावंत यांचा बॅनरवरील फोटो हटविण्यात आला आहे. त्या जागी अन्य पदाधिकाऱ्याचा फोटो चिकटवण्यात आला आहे. काही तासामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेऊन चुक सुधारण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न : फाळके

आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत, असे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु आम्ही सर्व उदय सामंत आणि भैय्या सामंत समर्थक आहोत, असे रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT