Prithviraj Chavan-Milind Narvekar-Nitesh Rane
Prithviraj Chavan-Milind Narvekar-Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Nitesh Rane News : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा नार्वेकरांना भेटायचे; मग काँग्रेस आमदारांना : राणेंचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसची (Congress) मैत्री ही आजची नाही, पहिल्यापासून ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आहेत. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे काँग्रेसच्या आमदारांना लवकर भेटायचे नाहीत. पण, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना लगेच भेटायचे. त्यानंतर काँग्रेस आमदारांना भेटायचे, असा आरोप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी चव्हाण यांच्यावर केला. (Prithviraj Chavan First meet to Milind Narvekar before; Then to us Congress MLAs : Nitesh Rane)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ज्या पद्धतीने ताकद मिळत आहे, तशी ताकद काँग्रेसकडून नारायण राणे यांना मिळाली नाही, अशी खंतही नीतेश यांनी या वेळी बोलून दाखवली.

सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात आमदार राणे बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी २०१९ ची आघाडी स्थापन झाली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले. पण मला नेहमी वाटतंय की, मी १२ वर्षे काँग्रेसमध्ये होतो, त्यातील पाच वर्षे आमदार होतो. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मैत्री ही आजची नाही. पहिल्यापासून ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आहेत. त्याला तुम्ही दोस्ताना म्हणा किंवा म्हणू नका. पण हे पहिल्यापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.

काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अगोदर काँग्रेस आमदारांना लवकर भेटायचे नाहीत. पण, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना मात्र लगेच भेटायचे, त्यानंतर काँग्रेस आमदारांना भेटायचे. वांद्रे पोटनिवडणुकीच्या वेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नारायण राणे यांच्याकडे ‘तुम्ही वांद्र्याची पोटनिवडणूक लढवा’ असे सांगायला आले होते. सोनिया गांधी यांच्या शब्दाखातर नारायण राणे ती पोटनिवडणूक लढवली, असेही नीतेश यांनी नमूद केले.

राणे म्हणाले की, आम्ही सर्वजण राणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करत होतो, तर काँग्रेसचे सर्व नेते ही सीट पडणार कशी, यासाठी धावपळ करत होते. काही नेते तर राणे यांच्या प्रचाराचे नियोजन आले की लगेच मातोश्रीला फॅक्स करायचे. अशी या पक्षाची अवस्था आहे. मग पक्ष कसा मोठा होणार. आज राहुल गांधी यांची जी अवस्था झाली आहे, ती असल्या गोष्टींमुळेच झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ज्या पद्धतीने भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस उभे आहेत, तीच ताकद २००५ ला राणेंच्या पाठीशी उभी राहिली असती तर आज महाराष्ट्राचे राजकारण वेगळे असते. आम्ही जेव्हा शिंदेंच्या पाठीशी उभी राहिलेली ताकद पाहतो, तेव्हा वाटतं की राणेंच्या पाठीशी त्यावेळी ताकद उभी राहायला पाहिजे हेाती. काँग्रेसला राणे कधीच कळलेच नाहीत. राणेंची ताकद काँग्रेसला कधी वापरायलाच मिळालेली नाही, अशी खंतही नीतेश राणे यांनी बोलून दाखवली.

राणेंपेक्षा उद्धव ठाकरेंना काँग्रेसने जादा मदत केली

गुलामनबी आझाद, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा काय बोलतात, ते बघा. प्रत्येक जण काँग्रेसमध्ये राहून आलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे की काँग्रेसमध्ये काही कोणाचं भलं होणार नाही. वाटच लावयाला बसेल आहेत, ते. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये पूर्वीपासून मैत्री होती. बारा वर्षांच्या कारकिर्दीत काँग्रेसने राणेंना जेवढी मदत केली नसेल तेवढी मदत उद्धव ठाकरेंना केली आहे, असा दावाही नीतेश यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT