MPSC Students Protest; IPS Sandeep Singh Gill And IAS Tukaram Mundhe Sarkarnama
कोकण

MPSC Students Protest : तुकाराम मुंढे, संदीपसिंह गिल यांचा समितीत समावेश करू : MPSC विरोधातील आंदोलनावर महायुतीच्या नेत्यांचे वक्तव्य

Uday Samant On MPSC Students Protest : मागील काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून महायुतीतील कॅबिनेट मंत्र्यांनी भाष्य केले आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जोपर्यंत भीमनवार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, आता या आंदोलनावर रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांची मागणी असेल तर चौकशी समितीत तुकाराम मुंढे, संदीपसिंह गिल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे. पुणे शहरातील एस. एम. जोशी पूल परिसरात बसून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून विरोधी पक्षातील नेतेदेखील या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. यामुळे हे आंदोलन राजकीय झाल्याचा दावा आता सत्ताधारी करताना दिसत आहेत.

दरम्यान, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, तातडीने आंदोलनाची जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. यामुळे आगामी काळात अधिक तीव्र संघर्ष होण्याची शक्यता असून, पोलिस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यातील अनेक मागण्या मान्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. मात्र, ज्या मागण्या संविधानात बसत नाहीत, त्या पूर्णच होऊ शकत नाहीत.

याबाबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर कुठेही अन्याय होणार नाही, याची दक्षता सरकार घेईल, अशी हमीही मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर दिली आहे. आता माझ्यासह आणखी दोन मंत्री तिथे जाणार आहेत. पण आताची स्थिती पाहता आम्ही तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांच्या ज्या मागण्या मान्य करायच्या होत्या, त्या मान्य केलेल्या आहेत. आता संवाद सुरू आहे.

मात्र, ज्या मागण्या मान्य होणार नाहीत, त्याबाबत तिथे जाऊन बोलण्यात काहीच अर्थ नाही. मात्र, आजही मी सांगतो की, राज्याचा मंत्री म्हणून मी दोन्ही नेत्यांशी बोललो आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांची मागणी असेल तर आयएएस तुकाराम मुंढे, आयपीएस संदीपसिंह गिल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा चौकशी समितीत समावेश केला जाईल. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल. मात्र, या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या मागण्या पूर्ण होणार आहेत, त्यांचाच विचार एमपीएससीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी करावा, असेही आवाहान उदय सामंत यांनी केले आहे.

या विद्यार्थ्यांसाठी मंत्रीच काय, तर आमचे संपूर्ण सरकार सकारात्मक आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्या या परीक्षा देत आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, हीच आमची सगळ्यांची भूमिका असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT