Raigad Political News : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे आता समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाबाबतही इच्छा बोलून दाखवली असून, मी मंत्रिपदासाठी आशावादी असल्याचे म्हटले आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी देखील दळवींना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असे सुतोवाच केले आहे. दळवी यांचा आग्रह आणि गोगावले यांच्या सुतोवाचानंतर रायगड जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. सध्या आदिती तटकरे आणि गोगावले यांच्या रूपाने दोन मंत्रिपदं जिल्ह्यात आहेत.
राज्यात एकीकडे महायुती एकत्र असल्याचे चित्र असताना रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद अद्यापही होताना दिसत नाही. शिवसेना नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद मिटण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून यावरून देखील शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष केले होते.
दळवी यांनी तर तटकरेंवर राष्ट्रवादीवर तीव्र संताप व्यक्त केला होता. राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष असून आम्ही राष्ट्रवादीला गणतीत पकडत नाही. आमचे आणि भाजप विचार जुळतात, असे स्पष्ट करत आगामी काळात रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. या लढाईसाठी एक नाही तर चार जण तयार असून ही लढाई आम्ही नक्की जिंकूच सोबत तटकरे कुटुंबाला येणाऱ्या काळात मोठा झटका देवू असाही इशारा दिला होता.
दळवी यांच्या या इशाऱ्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली असतानाच आता त्यांच्या दुसऱ्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. दळवी यांनी स्वतःच्या मंत्रिपदाबाबतही इच्छा बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दळवी यांनी, आम्ही पक्षाच्या पडत्या काळातील आमदार असून आम्ही पक्षाला पडत्या काळात साथ देणारे पहिल्या फळीतील आमदार आहोत. पक्षाने आम्हाला भरत गोगावले यांच्या रूपाने एक मंत्री दिलेला आहे, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना मला मंत्रिपद मिळावे अशी आशा आहे. पण याचा निर्णय आणि सर्वस्व अंतिम अधिकार पक्षाच्या वरिष्ठांकडे आहे. पण मी आशावादी असून येणाऱ्या काळात पक्ष माझ्यासाठी नक्कीच विचार करेल, असे त्यांनी म्हटलं आहे.
तर भरत गोगावाले आमचे नेते आहेत, आदारणीय आहेत, चार टर्म ते आमदार राहिले असून मंत्री आहेत. यामुळे नेमकं काय हे माहित नाही. पण वरीष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तो मान्य करावं ही लागेल. पण मी आशावादी आहे. मागे देखील बोलून दाखवलं आताही बोलतं आहे. पण आज समाधानी आहे की गोगावले पालकमंत्री झाले आहेत. पालकमंत्री आम्हाला मिळालं, हक्काचं माणूस मिळाला.
यानंतर होणाऱ्या चर्चांवर गोगावले यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून त्यांनी, ठीक आहे ना, प्रत्येकालाच असं वाटतं मग यात चुकीचं काय? पण जेवढं संख्याबळ असेल तेवढेचं आपल्याला मिळणार आहे. दळवी यांना देखील मागे-पुढे भविष्यात मंत्रीपद मिळू शकतं, असे संकेत गोगावले यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.