Raigad News : नुकताच रायगडच्या पालकमंत्रीपदावर निर्णय झाला असून शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता शिवसेनेकडून खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली जात आहे. यानंतर तटकरे यांनी जोरदार पलटवार केला असून शिवसेना नेत्यांच्या दाव्यातील हवा काढली आहे. त्यांनी गोगावलेंना मिळालेल्या पालकमंत्रीपदात आपलाही पुढाकार असून त्यात वाटा असल्याचे म्हटले आहे. ते अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गोगावले यांची नियुक्ती झाली असून, यानंतर त्यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत झाले. तसेच त्यांचे अभिनंदनही केले जात आहे. राजकीय वाद विकोपाला गेलेल्या तटकरे कुटुंबीयांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले आहे. यावरूनच पत्रकारांनी गोगावलेंना प्रश्न करत तटकरे आपले अभिनंदन केले का, असा सवाल केला होता. यावर त्यांनी, मंत्रालयात आदिती तटकरे यांनी, तर अनिकेत तटकरे यांनीदेखील आपले अभिनंदन केल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी अद्याप खासदार सुनील तटकरे यांनी आपले अभिनंदन केलेले नाही, असे म्हणत बघू ते कधी करतात, असेही म्हटले होते.
दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील रखडलेल्या रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपदावरून तटकरेंना निशाणा करत, त्यांचेच लाड आतापर्यंत महायुतीच्या नेत्यांनी पुरवल्याचा घणाघात केला होता. सध्या या वादावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या सर्व घडामोडींवर आता तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी, रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हणत, गोगावले पालकमंत्री होण्यात माझा पुढाकार होता, असा दावा केला आहे.
तर रायगडला पालकमंत्री नव्हते म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता. विकासकामे चालूच होती. पर्यटन, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे अशा सर्वच विभागांतील विकासाचा आढावा दिला आहे. या कामांना चालना दिल्याचेही तटकरे म्हणाले.
पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसी अंतर्गत एक प्रणाली व्यवस्था आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेलच. रायगड जिल्ह्याला पावणे दोन वर्षे पालकमंत्री नव्हते, म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता. विकासकामे चालूच होती, असे तटकरे म्हणाले. गोगावले पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. त्यात माझाही पुढाकार होता, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.