Raigad News : महायुतीत रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अखेर दीड महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला. काही नव्या चेहर्यांचा पालकमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. तर काहींना प्रचंड फिल्डिंग लावूनही पालकमंत्रीपदासाठी डच्चू देण्यात आला आहे. त्यातही रायगडमध्ये शिवसेनेच्या भरत गोगावलेंना (Bharat Gogawale) दुसर्यांदा संधी नाकारत तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिले गेल्यानं मोठी संताप आणि नाराजीची लाट उसळली होती. त्यातच आता गोगावलेंपेक्षा रायगडमधीलच शिंदेंचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल,पण आम्ही तटकरेंना स्वीकारणार नाही असं असा इशारा दिल्यानं कोकणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महायुतीत पहिल्यापासूनच रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन खटके उडाल्याचं दिसून आलं होतं. महायुती सरकारच्य या आधीच्या काळात शिवसेनेच्या भरत गोगावलेंकडे मंत्रिपदच न दिल्यामुळे त्यांनी अडीच वर्ष संयम ठेवला. पण आता मंत्रिपद मिळाल्यानंतरही दुसर्यांदा पालकमंत्री पदावरुन डावलल्यानंतर मात्र,गोगावले समर्थकांच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यांनी तीव्र नाराजी दर्शवल्यानंतर पुन्हा राज्य सरकारकडून काही तासांतच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर रायगडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
कर्जत-खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही असं वक्तव्य केल्याने युतीसह रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या उठावामध्ये रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही होतो. प्रमुख दावेदार असतानाही मागच्यावेळी भरत गोगावलेंनी फक्त शिवसेना संघटनेला बळ देण्यासाठी मंत्रिपदाचा त्याग केला. खरंतर त्याचवेळी त्यांनी ठरवलं असतं तर ते रायगडचे पालकमंत्री झाले असते, असंही थोरवे यांनी यावेळी महायुतीला ठणकावलं.
थोरवे म्हणाले,आम्ही उठाव केल्यामुळेच महाराष्ट्रात परिवर्तन झालं, त्यामुळेच भाजप- शिवसेना युतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं.गोगावलेंना खातं कोणतं दिलं यांबाबत मी काहीच बोलणार नाही.परंतू,त्यांना कॅबिनेटमंत्री केलं, तेव्हा त्यांनाच पालकमंत्री पद द्यायला हवं होतं, अशी आमची सर्वांची एकच मागणी होती. उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार असताना रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार असताना चुकीचा निर्णय घेतला होता.त्याविरोधातच आम्ही उठाव केला, असंही आमदार थोरवेंनी यावेळी सांगितलं.
बहुमतानं सरकार स्थापन झालं, भाजप आणि सेनेचे जिल्ह्यात तीन तीन आमदार निवडून आले असतानाही गोगावलेंना पालकमंत्रिपदासाठी का डावलण्यात आलं,असा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आम्ही एकमतानं गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाबाबत सुध्दा सांगितलं होतं, पण आम्हांला असा निर्णय येईल असं अपेक्षित नव्हतं,अशी नाराजीही थोरवेंनी बोलून दाखवली.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले आहेत. शिंदे म्हणाले, 'भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदाची मागणी करत असतील तर यामध्ये चुकीचे काय आहे? अपेक्षा करणे यात वावगे काय आहे? त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून यावर तोडगा काढू.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.