Karjat road problem viral video: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे-खांडपे रस्त्याची दुरवस्था दाखवणाऱ्या तीन शाळकरी मुलींचा पत्रकारितेच्या धाटणीतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुलींनी रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास आपल्या खास रिपोर्टिंग शैलीत मांडल्यानंतर प्रशासनासह स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पातळीवरही या समस्येची दखल घेण्यात आली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे.
दरम्यान, व्हिडिओमुळे मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुली आणि त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला. ‘कुणी तुम्हाला सतावले, तर मला लगेच सांगा. आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा धीर त्यांनी दिला.
कोंदिवडे-खांडपे येथील नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या शाळकरी मुलींनी शाळेत (School) जाताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला. पत्रकारांच्या शैलीत केलेल्या या रिपोर्टिंगमध्ये त्यांनी रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचे चित्रण केले.
मुलींच्या व्हिडिओमधील ‘द्रुतगती महामार्गावरून जाताना पोटातलं पाणीही हलत नाही’ ही ओळ विशेष चर्चेत आली. मुलींनी सांगितल्यानुसार, आदल्या दिवशी त्यांच्या शिक्षकांनी द्रुतगती महामार्गाबाबत माहिती देताना चांगल्या दर्जाच्या रस्त्यावरून प्रवास करताना ‘पोटातलं पाणीही हलत नाही’, असे उदाहरण दिले होते.
हाच संदर्भ त्यांनी गावातील रस्त्याच्या दुरवस्थेशी जोडत आपल्या व्हिडिओमध्ये वापरला. द्रुतगती महामार्ग आणि गावातील रस्त्यांमधील फरक दाखवणाऱ्या या मिश्किल, पण बोचऱ्या मांडणीमुळे व्हिडिओला सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळाली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांचे लक्ष या मुलींकडे गेले. गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमांचे प्रतिनिधी मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाखती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक युवा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी मुली आणि त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुलींच्या धाडसाचे कौतुक केले. “तुम्ही सत्ताधारी आणि आम्हा विरोधकांना झणझणीत अंजन घातले आहे. यातून आम्ही राजकीय लोकांनी शिकले पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच, मुलींच्या धाडसाचे कौतुक करताना, “काही लागले तर सांगा. कुणी तुम्हाला सतावले तर मला लगेच सांगा. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले. मुलींच्या धाडसामुळे इतर विद्यार्थ्यांनाही आपल्या परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रेरणा मिळेल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
संवादादरम्यान मुलींच्या वडिलांनी गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांचे प्रतिनिधी घराभोवती येत असल्याचे आदित्य ठाकरे यांना सांगितले. यावर आदित्य ठाकरे यांनी मिश्किलपणे ‘पिपली लाइव्ह’सारखे झाले आहे, अशी टिप्पणी केली. मात्र, माध्यमांच्या वाढत्या वावरामुळे भीती वाटू लागल्याचे मुलींच्या वडिलांनी सांगितले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी कुटुंबाला धीर देत, “काही घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुलींना बळ द्या. काही लागल्यास मला सांगा. मी आहे आणि शिवसेना तुमच्यासोबत आहे,” असे सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्याशी झालेला संवाद संपल्यानंतर मुलींच्या कुटुंबीयांनी आता घाबरण्याचे कारण नसल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी केलेला साधा व्हिडिओ एवढा चर्चेत येईल, याची कल्पना मुलींनाही नव्हती. मात्र, त्यांच्या व्हिडिओमुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा प्रशासनाच्या आणि राजकीय नेत्यांच्या चर्चेत आला आहे. कोंदिवडे-खांडपे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग आला असून, तीन शाळकरी मुलींनी केलेल्या अनोख्या ‘रिपोर्टिंग’मुळे स्थानिक रस्त्याचा प्रश्न सोशल मीडियापासून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.