Raigad Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
कोकण

Raigad Politics: रायगड लोकसभेत कोण भिडणार? तुल्यबळ उमेदवार कोण?

Raigad Lok Sabha Constituency 2024: रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे व अनंत गिते यांची लढत तुल्यबळ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोकणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व मावळ हे तीन लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत. रायगड लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे नाव पुन्हा या वेळी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. पण असं असतानाही भाजपकडून मात्र त्याला जाहीरपणे विरोध करत धैर्यशील पाटील यांचा भावी खासदार असा उघडपणे उल्लेख यापूर्वी करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीकडून अनंत गिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे महायुतीकडून उमेदवार कोण याची चर्चा असली तरीही रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे व अनंत गिते यांची लढत तुल्यबळ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव वगळता सगळ्या विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व आहे. अशातच भाजपकडून धैर्यशील पाटील यांचे नाव समोर आले आहे. वर्षभरापूर्वी पारंपरिक शेकापचे असलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना दक्षिण रायगडची जबाबदारी देत भाजपकडून रायगड लोकसभेचे भावी उमेदवार म्हणून लॉन्च करण्यात आले. त्यामुळे रायगड लोकसभेत महायुतीकडून सुनील तटकरे व धैर्यशील पाटील ही दोन नावे चर्चेत आहेत. या महायुतीमध्ये हे वाद सुरू असतानाच आता महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव महाड येथील युवा सेनेकडून भावी खासदार असा उल्लेख करत चर्चेत आणले आहे.

मात्र, या सगळ्यांचा विचार केल्यास महाविकास आघाडीचे अनंत गिते हे आजवर पाच वेळा खासदार राहिले आहेत. दहा ते पंधरा वर्षे ते केंद्रात मंत्री राहिले आहेत. रायगड लोकसभा हा कुणबी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनंत गिते यांच्यासमोर महायुतीकडून तगडा व अनुभवी उमेदवार असल्यास निभाव लागेल हे स्पष्ट आहे. भावनेच्या आधारे येथे उमेदवारी दिल्यास महायुतीला धोका होण्याची शक्यता अधिक आहे.

धैर्यशील पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ...

धैर्यशील पाटील हे रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहेत. मात्र, या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या ठिकाणी हे नाव फारसे परिचित नाही. महाड पोलादपूर परिसरातही धैर्यशील पाटील हे कितपत चालतील याबाबत महायुतीच्या नेत्यांनीही विचार केला आहे. रायगडमध्ये शेकापचे वर्चस्व व प्राबल्य मोठे आहे. धैर्यशील पाटील हे शेकापमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे महायुतीकडून धैर्यशील पाटील हे उमेदवार राहिल्यास शेकापमध्ये त्यांचे असलेले संबंध त्यामुळे त्यांना शेकापकडून मोठी ताकद धैर्यशील पाटील यांना मिळू शकते ही त्यांची जमेची बाजू आहे. पण एकंदरच तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील हे नाव रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी काहीसं नवीन आहे. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील यांचा या लोकसभा मतदारसंघातील संपर्क मर्यादित आहे. त्यामुळे महायुतीकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिल्यास या गोष्टींचा विचार महायुतीला करावा लागेल.

सुनील तटकरे यांच्या जमेच्या बाजू ...

सुनील तटकरे यांचा 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनंत गिते यांच्यासमोर निसटता पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे दणदणीत मतांनी विजयी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेकापची खंबीर साथ होती तर महाडमधून काँग्रेसचे नेते, माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीही भक्कम साथ त्यांना मिळाली होती. आता माणिकराव जगताप यांची सुकन्या स्नेहल जगताप या ठाकरे गटात आहेत. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गोष्टी तटकरे यांच्या सोबत नसतील. रायगडमध्ये मोठे प्राबल्य असलेल्या असलेल्या शेकापचा सामनाही तटकरे यांना करावा लागेल.

या काही अडचणी खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर आहेत. पण राजकारणातील मुरब्बी असलेले खासदार सुनील तटकरे याही अडचणी निभावून नेऊ शकतात. धैर्यशील पाटील यांच्या तुलनेत सुनील तटकरे यांचे नाव रायगड लोकसभा मतदारसंघात सगळ्यांनाच परिचित आहे. त्यांचा मोठा जनसंपर्कही आहे. इतकेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे ते यापूर्वी पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे दापोली, मंडणगड, खेड व गुहागर व या दोन्ही विधानसभा मतदारसंघातही त्यांचा मोठा संपर्क आहे या सुनील तटकरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. या दोन्ही मतदारसंघातही सुनील तटकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंबई भांडुप येथील कुणबी समाजाच्या वसतिगृहाचा प्रश्न गेले कित्येक वर्षे ताटकळत होता. मात्र, हा प्रश्न मार्गी लावून नूतन वास्तू उभी उभी राहिली यासाठी निधी देण्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाची ही मोठी साथ तटकरे यांना मिळू शकते.

रायगड- 32 या लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. पेण विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून, भाजपाचे रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर गुहागरचा अपवाद वगळता सगळे विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी तूर्तास अनुकूल दिसत असला असला तरी महाविकास आघाडीच्या अनंत गिते यांच्यासमोर तगडा व तुल्यबळ उमेदवार कोण असणार, यावरच विजयाची गणित ठरतील.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT