Raigad News : रायगड जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला असतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे रायगडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, राजीनामा देण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रायगड जिल्ह्यातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. नुकताच कर्जतमधील टोरंट पॉवर प्रकल्पावरून राजकीय वाद वाढला असतानाच दोन्ही पक्षांतील मतभेद आणि वाद चव्हाट्यावर आले आहेत.
एकीकडे या प्रकल्पावरून आमदार महेंद्र थोरवे हे सुनील तटकरे यांना लक्ष्य करताना दिसत आहेत, तर त्यांचे आरोप परतवून लावण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे, पेण विधानसभा मतदारसंघात तटकरे यांची ताकद कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
म्हसकर हे पेण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट सुनील तटकरे यांच्याकडेच दिला आहे. मात्र, राजीनामा देताना पत्रात कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून म्हसकर हे प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. मात्र, पक्षांतर्गत राजकारणामुळे म्हसकर यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.