NCP Setback Sarkarnama
कोकण

NCP Political Crisis : NCP त नाराजीचा स्फोट! अवघ्या दोन दिवसांत दोन बड्या नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे; रायगडच्या राजकारणात खळबळ

Sunil Tatkare Political Setback In Raigad : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन बडे धक्के बसले असून अवघ्या 48 तासांच्या आधी तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या नेत्याने आपला पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात अवघ्या ४८ तासांत दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पेण-रोहा-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे पक्ष कार्याध्यक्ष प्रमोद अनंत म्हसकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच माणगावचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीला संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तटकरे समर्थक प्रमोद म्हसकर यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण-रोहा-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे पक्ष कार्याध्यक्ष प्रमोद अनंत म्हसकर यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रायगड जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचा लेखी राजीनामा सादर केला. म्हसकर हे सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने रायगडसह कोकणातील राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

म्हसकर यांनी आपल्या राजीनामापत्रात वैयक्तिक तसेच राजकीय कारणांचा उल्लेख केला आहे. पक्षातील पदाची जबाबदारी सांभाळताना संघटनात्मक आणि सामाजिक स्तरावर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच पक्षाने आजवर दिलेली संधी, पद आणि सहकार्याबद्दल वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, म्हसकर यांनी केवळ पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. तरीही त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

४८ तासांत दुसरा धक्का; आनंद यादव यांची पक्ष सोडण्याची घोषणा

प्रमोद म्हसकर यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माणगावचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांनी ५ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांसोबत आयोजित केलेल्या चर्चाविनिमय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. यावेळी बोलताना यादव यांनी २००० सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केल्याचे सांगितले. तटकरे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आपल्याला दिलेले प्रेम व विश्वास कधीही विसरणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षात नव्याने आलेल्या व्यावसायिक राजकारण्यांना अधिक महत्त्व दिले जात असून, अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत यादव यांनी व्यक्त केली. राजकारण हे उपजीविकेचे साधन नसून सामाजिक भावनेतून माणगावच्या विकासासाठी आपण काम करत आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे आगामी नगरपंचायत निवडणुकीसह कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार नसल्याचे यादव यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे माणगावमधील राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान

गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच अवघ्या ४८ तासांत पक्षातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित या घडामोडी घडल्याने राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला पेण-रोहा-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे, तर दुसरीकडे माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी थेट पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर नव्याने रणनीती आखावी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या दोन्ही घडामोडींनंतर पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात, नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काय प्रयत्न होतात आणि आगामी निवडणुकांपूर्वी संघटनेत कोणते बदल केले जातात, याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT