NCP Political Crisis : बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता कोणाला नको? नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेत्यामधील वाद पुन्हा पेटला!

Beed Municipal Council : बीड नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील गटबाजीमुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Beed Municipal Council
Beed Municipal Council sarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : बीड नगरपालिकेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली सत्ता कोणाला नको आहे? असा प्रश्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता आणि काही नगरसेवकांच्या वागण्यावरून पडल्याशिवाय राहत नाही. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांऐवजी सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारीच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, या सगळ्या प्रकाराकडे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कानाडोळा करत आहेत. नगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती, ते आमदार विजयसिंह पंडीत या वादावर अवाक्षर काढायला तयार नाहीत. आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके हे तर आपण या गावचेच नाही, असे दाखवत नगरपालिकेतील गटबाजीपासून दूर आहेत.

नाराज नगरसेवकांना धनंजय मुंडे यांचे पाठबळ असल्याची चर्चा अधूनमधून होते, पण ते थेट अजून समोर आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरपालिकेचे अकरा नगरसेवक सध्या स्वतंत्रपणे कारभार हाकताना दिसत आहेत. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची दोनदा भेट घेऊन समजूत काढली. मुंबईत या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढू, असा शब्दही त्यांनी या नाराजांना दिला.

Beed Municipal Council
NCP Political Crisis News : अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन नाही! सुप्रीम कोर्टात याचिका

मात्र, पालकमंत्र्यांची पाठ फिरताच शहरात पुन्हा गटबाजी उफाळून येते. बीड नगरपालिकेतील विकास कामाच्या कंत्राटाचे तुकडे पाडू नका, अशा सूचना नगराध्यक्षांना गेल्यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिल्या होत्या. विशेषतः पाणी पुरवठ्यासारख्या विषयात हे होता कामा नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते. जुलै महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या सभेत प्रत्येक वार्डात १० लाखांपर्यंतची कामे करण्याचा ठराव घेण्यात आला होता.

ही कामे करताना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार कामाचे तुकडे न पाडता जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवले. परस्पर पत्र पाठवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते फारूक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, उपाध्यक्ष विनोद मुळूक यांनी नगराध्यक्ष पारवे यांच्यावरचा राग प्रशासनावर काढला.

मुळूक यांनी पाणी प्रश्नाच्या कामाचे तुकडे पाडू नका सांगणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना बांधकाम विभागाच्या कामाचे तुकडे पाडले, त्याचे काय? असा सवाल करत संताप व्यक्त केला. एका विषयाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय कसा? यावर मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, ते काहीच न बोलल्याने सत्ताधारी नगरसेवक चांगलेच संतापले.

दरम्यान, ठरावाला उपनगराध्यक्ष मुळूक यांच्याकडून विरोध होत असल्याचे पाहून सभापती शेख निजाम त्यांच्यावर संतापले. यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यावर नगराध्यक्ष प्रेमलता पवार यांनी त्यात उडी घेत निजाम यांची बाजू घेत मुळूक यांना व्यासपीठावरून तुम्ही खाली जा, अशी भाषा वापरली. मी पालिकेचा उपाध्यक्ष आहे, मला खाली जा म्हणायला तुम्हाला जमते का? अशा शब्दांत जाब विचारला. यावरून वातावरण अधिकच तापले.

Beed Municipal Council
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

लाईव्ह गोंधळ पाहून बीडकरांच्या कपाळावर हात?

विशेष म्हणजे, काल झालेल्या नगरपालिकेतील सभेचे स्थानिक पातळीवर लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला, मात्र सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेतेच एकमेकांशी भांडताना पाहून बीडकरांनी कपाळावर हात मारून घेतला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या बारामती पॅटर्नच्या मॉडलकडे पाहून बीडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सत्ता दिली. पण त्यांच्या पश्चात नव्या सत्ताधाऱ्यांनी जनतेवर पश्चातापाची वेळ आणली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com