Shivsena Bharat Gogawale, MLA Mahendra Thorve, MLA Mahendra Dalvi And Sunil  sarkarnama
कोकण

Raigad Politics : रायगडच्या राजकारणात तटकरेचं वजन वाढलं? गोगावलेंनी आपल्याच शिलेदारांना एकटं पाडलं

Bharat Gogawale Raigad Guardian Minister : रायगडच्या राजकारणात एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विरूद्ध तटकरे असा राजकीय संघर्ष असतानाच मंत्री भरत गोगावलेंनी मात्र तटकरेंना जवळ करत आपल्याच शिलेदारांना एकटं पाडल्याची चर्चा आहे.

Aslam Shanedivan

Raigad political News : रायगडच्या राजकारणात एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विरुद्ध तटकरे असा संघर्ष रंगलेला असताना, मंत्री भरत गोगावले यांच्या एका वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे आक्रमक भूमिका घेत असताना, गोगावले मात्र तटकरे कुटुंबाच्या बाजूने सकारात्मक वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे गोगावलेंनी आपल्याच शिलेदारांना एकटं पाडलं का, असा सवाल रायगडच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

गोगावलेंच्या वक्तव्याने राजकीय समीकरणांची चर्चा

रायगडच्या राजकारणात आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे विविध मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. मात्र, नुकतेच रायगडचे पालकमंत्री झालेल्या भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळण्यात आमदार अनिकेत तटकरे यांचा ‘सिंहाचा वाटा’ असल्याचे म्हटले आहे.

गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंबाचे राजकीय वजन पुन्हा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, ज्या तटकरे कुटुंबावर शिवसेनेचेच काही आमदार सातत्याने निशाणा साधत आहेत, त्याच तटकरे कुटुंबाशी गोगावले जवळीक साधताना दिसत असल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

पालकमंत्रीपदावरून दळवींचा तटकरेंवर निशाणा

गेल्याच महिन्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. या निर्णयानंतर रायगडमध्ये शिवसेना अधिक ताकदवान झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र, पालकमंत्रीपद रखडण्यावरून आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यांनी आमदार अनिकेत तटकरे यांचा ‘राजकारणातील सरोगसी बाळ’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, “मी बैलगाडीचा बादशाह आहे. त्यामुळे कुठला बैल कधी बदलायचा, हे मला चांगलंच माहीत आहे,” असे म्हणत दळवींनी थेट इशाराही दिला होता.

अनिकेत तटकरेंचा दळवींना पलटवार

दळवींच्या या टीकेनंतर रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्याला अनिकेत तटकरे यांनीही प्रत्युत्तर दिले. “दळवी काय बोलतात, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यातून त्यांची संस्कृती दिसून येते,” असा पलटवार अनिकेत तटकरे यांनी केला होता.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी मात्र या संघर्षात संयमी भूमिका घेतली. रायगडमध्ये महायुती एकत्र असल्याचे सांगत विकासाला महत्त्व देण्याचे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय कलह कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

थोरवेंनी गोगावलेंच्या सत्कार सोहळ्यातच तटकरेंना सुनावलं

मात्र, त्यानंतर गोगावले यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमातच आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना लक्ष्य केले. मतदारसंघातील विकासकामांवरून राष्ट्रवादी ‘रडीचा डाव’ खेळत असल्याचा आरोप करत थोरवेंनी तटकरेंना श्रेय लाटू नये, असा इशारा दिला.

पालकमंत्रीपद रखडण्यामागे तटकरेंचा हात असल्याचाही दावा त्यांनी केला. तसेच, गोगावले यांनी तटकरेंना समजावले नाही, तर आम्हीही दळवींच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रम करू, असा इशारा थोरवेंनी दिला होता.

दोन शिलेदार तटकरेंच्या विरोधात, गोगावले मात्र कौतुकात

एकीकडे महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे दोन्ही आमदार तटकरेंवर आक्रमकपणे टीका करत आहेत. हे दोन्ही नेते गोगावले यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळखले जातात. मात्र, गोगावले मात्र तटकरेंचे गुणगान करताना दिसत आहेत.

यापूर्वीही गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्यात तटकरेंचा वाटा असल्याचे म्हटले होते. आता त्यापुढे जात अनिकेत तटकरे यांचा पालकमंत्रीपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोगावलेंच्या भूमिकेमुळे दळवी आणि थोरवे यांची भूमिका काहीशी एकाकी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रायगडमध्ये नवी राजकीय समीकरणं?

रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या काही काळापासून सातत्याने पाहायला मिळत आहे. मात्र, गोगावले यांनी तटकरेंबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे या संघर्षाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार तटकरेंवर आक्रमक आहेत, तर दुसरीकडे पालकमंत्री गोगावले तटकरेंशी समन्वय साधताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आणि महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणे आता अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत.

आता गोगावले तटकरेंशी असलेला समन्वय कसा पुढे नेतात, दळवी आणि थोरवे आपली आक्रमक भूमिका कायम ठेवतात का आणि या सगळ्याचा रायगडच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT