Raigad Mahayuti Politics : राज्यात महायुती असली, तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेनंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी खरपूस समाचार घेत, आपल्याला दळवींच्या आकलनशक्तीची कीव येते, अशी टीका केली. ज्यानंतर रायगडमधील राजकीय तापमान आणखी वाढले असून, आता दळवींनीदेखील जोरदार पलटवार केला आहे.
त्यांनी अनिकेत तटकरे यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा सल्ला देत, आम्ही थांबलो नसतो, तर त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता, असा दावा केला आहे. तर दळवी यांच्या या जहरी टीकेनंतर रायगडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
राज्यात एकीकडे महायुती असली, तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय वाद सुरूच आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील वाद अद्याप थांबलेला नसून, तो शांतदेखील झालेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही थांबलेला नाही.
पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी, राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष असून, राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही. भाजप आणि आमचे विचार जुळतात, असे स्पष्ट करत जोरदार आगपाखड केली होती. तसेच येणाऱ्या काळात तटकरे कुटुंबाला मोठा झटका मिळेल, असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यानंतर विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींच्या दिल्लीवाऱ्यांचा हिशेबच देत तिखट टीका केली होती. तसेच सल्ला देत दळवींच्या अकलेची आणि त्यांच्या आकलनशक्तीची कीव येते, अशी खरमरीत टीका केली होती. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी खासदार तटकरे यांची मदत घेतली.
मात्र, आज तेच तटकरेंवर टीका करत आहेत. याबाबत त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, विधानसभेच्या निवडणुकीत मदतीसाठी त्यांनी किती वेळा तटकरेंकडे फेऱ्या मारल्या? काय काय केलं? हे सगळं माहीत आहे. अलीकडे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दळवींनी त्यांची पत्नी मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे, यासाठी तटकरे साहेबांकडे दिल्लीवाऱ्या केल्याचे सांगत अनिकेत तटकरे यांनी दळवींची पोलखोल केली होती.
ज्यावर दळवींनी पलटवार करत, अनिकेत तटकरे यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असे म्हणत पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. तसेच अनिकेत तटकरे यांचा सरोगसी बाळ म्हणून उल्लेख करत, आम्ही फॉर्म काढला नसता, तर लढाई होऊन आम्ही जिंकलो असतो. अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्म झालाच नसता, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, आता विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणाचा संदर्भ देत अनिकेत तटकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तटकरे-दळवी संघर्षाला आता वैयक्तिक राजकीय आरोप-प्रत्यारोपांची धार आली आहे. या जहरी टीकेनंतर पुन्हा एकदा रायगडमधील महायुतीतील अंतर्गत धुसफूस ऐरणीवर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.