Mumbai News : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारण व प्रशासनावर मजबूत पकड ठेवण्यासाठी महायुतीमधील भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विशेषतः खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने धाराशिवमधील राजकारण 360 डिग्रीमध्ये बदलले आहे. त्यातच आता याठिकाणी पालकसचिव असलेल्या अशू सिन्हा यांची बदली करण्यात असली असून त्यांच्या जागी राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशमुख हे सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सचिव आहेत. शिवाय ते मुळचे धाराशिव जिल्ह्यातील देवळालीचे रहिवाशी आहेत. आता देशमुख यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचा आता धाराशिव जिल्ह्यावर थेट वॉच असणार आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी ही पालकसचिवांची असते. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत पालकसचिवांची जबाबदारी महत्त्वाची मानली जाते.
शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे इथल्या कामकाजावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. दुसरीकडे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचीही इथल्या प्रशासनावर पकड आहे. जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडेच आहे. मात्र, आता महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील धाराशिव जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून याठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राजेश देशमुख यांची नियुक्ती केली असल्याची चर्चा आहे.
राजेश देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द पाहिली तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी अवघ्या १४ महिन्यांत ६२ हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करत 'स्वच्छ भारत अभियानात' उत्कृष्ट काम केले. माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये दुष्काळमुक्ती आणि रोजगाराचे विविध उपक्रम राबवले. यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी असताना त्यांनी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. बँकेकडून पीक कर्ज मिळण्यात येणारे अडथळे दूर केले, ज्यामुळे कर्जवाटप दुप्पट झाले आहे.
कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी 'हाफकीन'चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या 'पुणे रिंग रोड' प्रकल्पाच्या भूसंपादनात त्यांनी अत्यंत वेगाने आणि प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांची ओळख दिवंगत नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय अधिकारी अशी झाली होती.
पुणे जिल्हाधिकारी पदानंतर त्यांनी राज्याचे क्रीडा आयुक्त, कोकण विभागीय आयुक्त तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही वरिष्ठ पातळीवर काम पाहिले आहे. आता देशमुख यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकसचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि धोरणात्मक नेतृत्वासाठी 'पालकमंत्री' असतात, त्याचप्रमाणे प्रशासकीय पातळीवर समन्वय राखण्यासाठी आणि योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस. अधिकाऱ्यांची 'पालक सचिव' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पालकमंत्री हे जिल्ह्याचे 'व्हिजन' ठरवतात, तर पालक सचिव हे ते व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा चालवतात. दोन्ही पदांमधील उत्तम समन्वय हा जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य पाया असतो. जिल्ह्याचे प्रलंबित प्रस्ताव किंवा निधीचे विषय मंत्रालयात अडकले असल्यास ते गतीने मंजूर करून घेण्याची जबाबदारी पालकसचिवांची असते. त्यासोबतच शासकीय नियम, निधीचा विनियोग आणि तांत्रिक बाबी कायद्यानुसार पूर्ण होत आहेत का ? यावर कडक नजर ठेवण्याची जबाबदारी आता देशमुख यांची असणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.