Raigad Zilla Parishad Political Clash; ZP chairman Mangesh Wakdikar Sarkarnama
कोकण

ZP Controversy : भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांची खुर्ची धोक्यात : पीए लाचखोरीत सापडताच मित्र पक्ष राजीनाम्यासाठी आक्रमक

Raigad Zilla Parishad Political Row : रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सापळा रचून स्वीय सहाय्यकाला दीड लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात अटक केली होती.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्हा परिषदेचा कारभार भाजप नेत्यांच्या दबावाखाली सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवारी (ता. २८) जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषदेतील वित्त लेखा सहाय्यक योगेश भस्मे यांच्यावर शिक्षक बदली प्रकरणात दीड लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा राखत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी केली.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होऊ नये तसेच अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, अशी विनंती त्यांनी केली. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शंकर गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतलेल्या परिषदेत भोईर यांनी जिल्हा परिषदेतील कारभाराबाबत अनेक आरोप केले आहेत. अध्यक्षांना कोणत्याही फाईलवर थेट सही करण्याचे अधिकार नसतानाही त्यांच्या सूचनेनुसार काही फायलींवर अधिकाऱ्यांना सह्या कराव्या लागत असल्याचा आरोप भोईर यांनी केला.

या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप वाढत असून, त्यातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आले असून, अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे घटक सत्तेत आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी आळीपाळीने स्वीकारण्याचे राजकीय समीकरण असताना सत्तेच्या सुरुवातीलाच घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी तसेच अन्य घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करीत शिवसेना (उबाठा) ने आक्रमक भूमिका घेतली आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिक्षक बदली प्रकरणात दीड लाख रुपयांची लाचप्रकरणी अटकेत असलेले योगेश भस्मे यांची पोलिस कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर भस्मे यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला; मात्र न्यायालयाने भस्मे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT