Shetkari Kamgar Pakasha leaders are avoiding participation in many initiatives of the Mahavikas Aghadi 
कोकण

SKP Fails : कधीकाळी पाच आमदार देणारा शेकाप आज शून्यावर, साडेसहा दशकांचा बालेकिल्लाही भाजपकडून जमीनदोस्त

Shetkari Kamgar Party Suffers in Raigad Zilla Parishad Elections : एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा ZPच्या निकालांनंतर भाजपचा नवा राजकीय गड बनला आहे.

सरकारनामा ब्युरो

  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

  • पाच दशकांहून अधिक काळ ताब्यात असलेली अलिबाग पंचायत समितीची सत्ता शेकापच्या हातून निसटली आहे.

  • जुने नेते पक्ष सोडून गेल्याने आणि जनाधार घटल्याने शेकापचे रायगडमधील अस्तित्व धोक्यात आले आहे.

Raigad News : वसंत जाधव

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा ZPच्या निकालांनंतर आता अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे. येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शेकपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला असून भाजप मजबूत स्थितीत पोहचला आहे. तर ज्या जिल्ह्याने कधी शेतकरी कामगार पक्षाला पाच-पाच आमदार दिले, खासदार केले त्याच जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेवर काही अपवाद सोडले तर शून्यावर आला आहे. यामुळे येथे शेकापचे जिल्ह्यातील अस्तित्वच धोक्यात आले आले असून शेकापची पूर्णपणे वाताहत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या साडेसहा दशकांहून अधिक काळ पनवेल तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) ग्रामीणमधील अभेद्य समजला जाणारा गड अखेर कोसळला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालांमधून शेकापची पूर्णपणे वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्या जागी भारतीय जनता पक्षाने आपला नवा आणि भक्कम राजकीय बालेकिल्ला उभा केला आहे.

विधानसभा निवडणूक, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती – अशा सलग निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशामुळे भाजपने शेकापला चारही बाजूंनी घेरत निर्णायक पराभव दिला आहे. या राजकीय उलथापालथीमागे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उभारलेली मजबूत संघटनात्मक बांधणी निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.

शेकापचा बालेकिल्ला कसा ढासळत गेला?

शेकाप हा महाराष्ट्रातील अत्यंत जुना आणि एकेकाळचा प्रभावी विरोधी पक्ष मानला जातो. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत खटारा चिन्हाला दीर्घकाळ जनतेचा पाठिंबा लाभला होता. माजी खासदार स्व. दि. बा. पाटील आणि रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेत पनवेलचे प्रतिनिधित्व केल्यामुळे पनवेल ही शेकापची कर्मभूमी आणि अभेद्य बालेकिल्ला मानली जात होती.

मात्र २००४ मध्ये रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेलच्या राजकारणात निर्णायक वळण आले. २००६ मध्ये पनवेल नगरपरिषद भाजपने जिंकली आणि २००९ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेलला पहिल्यांदाच बिगर-शेकाप आमदार मिळाला. याच टप्प्यावर जवळपास पन्नास वर्षे अबाधित असलेल्या शेकापच्या सत्तेला तडे जाऊ लागले.

शहरीकरण आणि बदलती लोकसंख्या

पनवेल परिसरात वेगाने झालेले शहरीकरण, औद्योगिक विस्तार आणि स्थलांतरित लोकसंख्येचा वाढता प्रभाव यामुळे शेकापची पारंपरिक ग्रामीण मतपेढी हळूहळू कमी होत गेली. दुसरीकडे, आमदार प्रशांत ठाकूर गेल्या चार टर्मपासून मतदारसंघाचे नेतृत्व करत असून, भाजपने ग्रामीण ते शहरी भागात सातत्याने संघटन मजबूत केली.

भाजपचा झंझावात

२०१७ आणि २०२६ या दोन्ही निवडणुकांत पनवेल महानगरपालिकेवर भाजपने सत्ता प्रस्थापित केली. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शेकापला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर लागलेल्या पंचायत समिती निकालांनी तर शेकापसाठी धक्कादायक चित्र उभे केले. १६ पैकी १५ जागा जिंकत भाजपने पंचायत समितीवरील लालबावटा खाली उतरवला.

जिल्हा परिषदेतही शेकापचा अस्त

जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातील आठही गटांमध्ये भाजपने बाजी मारली. आतापर्यंत पनवेल तालुक्यातून सर्वाधिक जागा देत शेकाप अलिबागच्या राजकारणाला बळ देत होता. मात्र यंदा भाजपने पनवेलमधून शंभर टक्के जागा जिंकत रायगड जिल्हा परिषदेत ‘किंगमेकर’ची भूमिका मिळवली आहे.

विशेष म्हणजे, संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेकापला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही, तसेच पंचायत समितीवरही सत्ता मिळवता आली नाही. या निकालांमुळे शेकापची ग्रामीण राजकारणातील पकड मोठ्या प्रमाणात ढासळली असून, पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकेकाळी लालबावट्याचा किल्ला मानला जाणारा पनवेल आज भाजपचा अभेद्य बालेकिल्ला बनला असून, हा बदल केवळ निवडणूक निकालापुरता मर्यादित न राहता पनवेलच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरत आहे.

FAQs :

1. शेकापला रायगड निवडणुकीत किती जागा मिळाल्या?
या निवडणुकीत शेकापला एकही जागा मिळालेली नाही.

2. अलिबाग पंचायत समितीवर शेकापची किती वर्षे सत्ता होती?
अलिबाग पंचायत समितीवर शेकापची पाच दशकांहून अधिक काळ सत्ता होती.

3. शेकापचा पराभव का झाला?
पक्षांतर्गत गळती, नेतृत्वाचा अभाव आणि घटलेला जनाधार हे प्रमुख कारण ठरले.

4. रायगडमध्ये शेकापचे पूर्वीचे स्थान काय होते?
रायगड जिल्हा शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता आणि पक्षाचे आमदार व खासदार निवडून येत होते.

5. या निकालाचा शेकापच्या भविष्यासाठी काय अर्थ आहे?
हा निकाल शेकापसाठी गंभीर इशारा असून पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT