Raigad Mahayuti Dispute; Sunil Tatkare And Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : महायुतीत मोठी ठिणगी! तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष चिघळला? भरत गोगावले यांच्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सभापतींची पाठ

Raigad Mahayuti Internal Conflict : रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकोपाला गेला असून आता या फटका जिल्हा परिषदेतील जलजीवनच्या योजनेच्या बैठकीला बसला आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही घडवून आणले जात आहेत. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अशातच या राजकीय वादाचा फटका आता जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीलाही बसला आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह सभापतींनीही दांडी मारली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद आणखी चिघळल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सभापतींनी प्रोटोकॉलनुसार मंत्री आदिती तटकरे यांनाही या बैठकीला निमंत्रित करणे आवश्यक होते, असा आग्रह धरला. मात्र, प्रशासन आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना निमंत्रित केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या बैठकीला राष्ट्रवादीचा एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या अनेक योजना रखडल्याची आपल्याला कल्पना आहे. या योजनांमध्ये अनेक त्रुटी आणि चुका आहेत. पुण्यातील एका संस्थेने या योजनांचा सर्व्हे केला; मात्र हा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाला असल्याची खंत पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रयत्न करून या योजना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालविकास सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, जलजीवन मिशनचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत १०० टक्के पूर्ण झालेल्या योजना, त्यांची सद्यस्थिती तसेच अपूर्ण योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण १,५९२ योजना मंजूर आहेत. त्यापैकी आजअखेर ९३६ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या असून, त्यापैकी २६२ योजना आर्थिकदृष्ट्याही पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी गोगावले यांनी तालुकानिहाय जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. रखडलेल्या योजनांची माहिती घेऊन त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या योजना पुढील वीस वर्षांचा विचार करून राबविल्या जातात. त्यामुळे त्यानुसार पाण्याच्या टाक्यांची क्षमता निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, प्रत्यक्षात त्या पद्धतीने काम होत नसल्याने अनेक योजना अडचणीत आल्या आहेत. येणारा काळ पाण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण असणार आहे. जलजीवन मिशनसाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइनचा दर्जा टिकाऊ नसल्याच्या तक्रारी आहेत. साठवून ठेवलेला पाइपचा साठा आगीत जळून गेला आहे. पाण्याच्या टाक्यांची बांधणीही अपेक्षित पद्धतीने झालेली दिसत नाही. अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या योजनेतील त्रुटी आणि चुका दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे गोगावले म्हणाले.

यंदा पाऊस २२ दिवस उशिरा सुरू झाला. सप्टेंबरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही भरत गोगावले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ठेकेदारांच्या बिलांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाल्यानंतरही काही ठेकेदारांची बिले रखडली आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने अदा करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी दिले.

दरम्यान, जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकीलाही महायुतीतील राजकीय संघर्षाची झळ बसल्याने रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सदस्यांची अनुपस्थिती, आदिती तटकरे यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप आणि भरत गोगावले यांची भूमिका यामुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात हा वाद आणखी कोणते वळण घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT