Dombivli News : ब्रिजभूषण सिंहांच्या समर्थनावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परबांना मनसे नेते राजू पाटील यांनी आता त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. ‘राज ठाकरेंबद्दल बोलण्याची यांची लायकी आहे का?’ असा सवाल करत पाटील यांनी परबांना सुनावले. काही लोकांना खूश करण्यासाठी आणि काही मतांच्या राजकारणासाठी इतरांना नाराज करण्याचा उद्योग किती दिवस चालणार, असा सवाल करत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही ‘आपल्या पदाधिकाऱ्यांना आवरा’ असा सूचक सल्ला दिला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्षाची धग अद्याप कायम आहे. दिवा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मनसे नेते राजू पाटील यांनी व्यासपीठावरून परब यांच्यावर थेट हल्लाबोल केला. नंदू परब यांनी हिंदी भाषिक समाजाच्या कार्यक्रमात ब्रिजभूषण सिंह यांना समर्थन देत राज ठाकरे यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या जुन्या वादाचा संदर्भ दिला होता. ‘ब्रिजभूषण सिंह यांना सलाम’ करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर एकेरी उल्लेखातून टीका केल्याने हा वाद चांगलाच पेटला. त्यानंतर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले.
याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी परबांना सुनावताना, ‘काही लोकांची लायकी नसताना ते बोलतात. त्यांना आपण किती महत्त्व द्यायचं?’ असा सवाल केला. ‘राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी आहे का? कोणाला कमीपणा दाखवण्यासाठी ब्रिजभूषण सिंह यांची वाहवा करायची?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मात्र, हा वाद केवळ परप्रांतीय विरुद्ध मराठी असा नसल्याचे स्पष्ट करत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ‘परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय हे सरसकट मनसेविरोधी किंवा महाराष्ट्रविरोधी आहेत, असे माझे म्हणणे नाही. आमच्या व्यासपीठावर असलेले अनेक उत्तर भारतीय आमचे चांगले मित्र आहेत. ते मराठी, आगरी भाषाही बोलतात,’ असे सांगत भावनिक राजकारणातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सुनावले.
‘आम्ही नेहरू मैदानाचा प्रश्न विचारला, शास्त्रीनगर रुग्णालयाचा प्रश्न विचारला; पण मूळ मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी विषय भरकटवण्यासाठी वेगळे मुद्दे पुढे आणले जात आहेत,’ असा आरोपही पाटील यांनी केला. केडीएमसीमध्ये सत्ताधारी पक्ष एकत्र असल्याने विकासाच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी नको त्या वादात पडू नका, असा टोला त्यांनी लगावला.
डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील हे माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असले तरी माझ्यासाठी भावासारखे आहेत, असे सांगत राजू पाटील यांनी वैयक्तिक टीकेवरून इशारा दिला. ‘सावरकर उद्यान असो किंवा शास्त्रीनगर रुग्णालयाचा प्रश्न असो, तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याचे राजकीय उत्तर द्या. वैयक्तिक पातळीवर गेलात तर उत्तरही वैयक्तिक पातळीवर येईल,’ असा इशारा त्यांनी परब यांना दिला.
‘सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप आहेत, त्यामुळे प्रश्न त्यांनाच विचारणार. प्रभू श्रीरामाला प्रश्न विचारणार का?’ असा मिश्कील सवाल करत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ‘राजू पाटलांनी कामं केली नाहीत म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं, त्यात वाईट काय? लोकशाही आहे. मात्र, राजकारण करताना वैयक्तिक गोष्टी मर्यादेबाहेर नेऊ नका,’ असेही ते म्हणाले.
शेवटी पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांनाच थेट सल्ला दिला ‘हे आवरा.’ त्यामुळे नंदू परब यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला भाजप-मनसे संघर्ष आता स्थानिक राजकारणातील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.