

Kalyan Dombivli MNS news : ठाण्यातील मीरा-भाईंदर इथं येत जैन मुनी नीलेशचंद्र यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाणीचा मुद्दा उकरून काढत, मारवाडी किंवा जैनांना पुन्हा मारहाण करण्यावर थेट लढण्याचा इशारा दिला.
नीलेशचंद्र यांच्या या इशाऱ्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी, यावरून जैन मुनी नीलेशचंद्र यांचे नाव न घेता, 'मुनींनी त्यांचं काम करावं, राजकीय सुपाऱ्या घेऊ नये', असं सल्ला दिला आहे.
राज्यात महापालिकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबई आणि मुंबई परिसरातील महापालिकांमधील निवडणुकांमधील राजकीय घडामोंडीकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना (Shivsena) फुटीनंतर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. ठाकरे बंधू युतीतून महापालिका निवडणुकीला समोरे जात आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई परिसरातील इतर महापालिकांमध्ये महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
महायुतीमधील भाजपसह एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना मराठी-अमराठी मुद्दा पुन्हा तापवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यातच जैन मुनी नीलेशचंद्र यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात, मीरा-भाईंदरमधून अमराठी व्यापाऱ्यांच्या मारहाणीचा मुद्दा बाहेर काढला.
महायुतीमधील भाजपच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणत, एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. नीलेशचंद्र यांनी ऐन महापालिका निवडणुकीत घेतलेली ही भूमिका म्हणजे, राजकीय वातावरण तापवण्याचा प्रकार, तर नाही ना, अशी शंका काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. त्यावर आता मनसेकडून नीलेशचंद्र यांना जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे.
राजू पाटील यांनी नीलेशचंद्र यांचे नाव न घेता, मुनींनी त्यांचं काम करावं, राजकीय सुपाऱ्या घेऊ नये, असा सल्ला दिला. तसंच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली. या युतीअंतर्गत मनसे 54 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.
राजू पाटील म्हणाले, मराठी मतांची ताकद एकत्र आणण्यासाठी ठाकरे बंधूंची ही युती निर्णायक ठरणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन जागा वाटपावर एकमत झाले असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा कल्याण डोंबिवलीत होईल.
दरम्यान, जे आमच्यातून गेले होते, त्यांचे पुन्हा फोन येत आहेत. मात्र त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद आहेत, अशा शब्दांत राजू पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. युती ठरल्यानंतर अनेकांची भूमिका बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कल्याण डोंबिवली निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असून, महायुती आणि इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभं राहण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.