Karjat Project Row News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट हायड्रॉलिक वीज प्रकल्पावरून वाद पेटला आहे. या प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जात असून, त्याविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे. ते येत्या 28 तारखेला कर्जतला जाणार असून, वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभाही होणार आहे. त्यामुळे कर्जतातील पर्यावरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात आंदोलनाची तयारी
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी परिसरातील सायडोंगर येथे टोरंट हायड्रॉलिक वीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 32,480 झाडे तोडली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. या वृक्षतोडीला स्थानिक नागरिक आणि विरोधकांकडून विरोध होत असून, महायुती सरकारच्या निर्णयावर टीका केली जात आहे.
या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन करण्याचा निर्णय कर्जत पर्यावरण बचाव समितीने घेतल्याची माहिती आहे. या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे कर्जतच्या दौऱ्यावर
या प्रकल्पाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर आता मनसेनेही या विषयात उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. ते येत्या 28 तारखेला कर्जतला भेट देऊन वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतमधील सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे स्थानिक नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
उद्योगपतींसाठी जमिनी दिल्या जात आहेत का?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पावरून सरकारवर टीका केली आहे. सरकार उद्योगपतींच्या घशात जमिनी घालण्यासाठी काम करत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही असाच प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वनमंत्री गणेश नाईक या विषयावर बोलत नसल्याची टीकाही देशपांडे यांनी केली.
दरम्यान, ग्रामपंचायतीचा ठराव न घेता आणि स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्पासंदर्भातील निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांचा विरोध डावलून वृक्षतोड सुरू करण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. या आरोपांमुळे स्थानिकांच्या हक्कांचा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा प्रश्न चर्चेत आला आहे.
राज ठाकरेंची नवी राजकीय मोहीम?
दरम्यान, अलीकडेच सबीर भाटिया यांच्या गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर भाष्य करणाऱ्या चर्चित डॉक्युमेंट्रीची पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली होती. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून पोस्ट हटवल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
आता कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. डॉक्युमेंट्रीच्या पोस्टवरून झालेल्या चर्चेनंतर कर्जतच्या पर्यावरणविषयक प्रश्नावरून मनसे कोणती भूमिका घेते आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, हे सभेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी परिसरातील सायडोंगर येथे टोरंट हायड्रॉलिक वीज प्रकल्पासाठी 640 एकर वनजमीन देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पासाठी 32,480 झाडे तोडली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. संबंधित परिसर वन विभागाच्या संवेदनशील आणि संरक्षित वनक्षेत्रात येत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम, स्थानिकांना विश्वासात घेतले गेले का आणि वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राज ठाकरे यांच्या कर्जत दौऱ्यानंतर या प्रकरणाला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.