Rajan Teli News : सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत मोठ्या राजकीय घडामोडी दसरा मेळाव्याच्या रात्रीत मुंबईत घडल्या. 2024 च्या विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतलेले माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेस जय महाराष्ट्र केला. एकीकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवर भर पावसात टीका करत होते. तर, दुसरीकडे शिंदे आगामी स्थानिकसाठी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून रणनीती आखत होते. ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे राजन तेली यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे तळकोकणात ठाकरेंना जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.
एकीकडे ठाकरे यांचे विश्वासू आणि राणेंचे कट्टरविरोधक असणाऱ्या तेलींना गळाला लावून शिंदे यांनी राजकारणातील मास्टरस्ट्रोक मारला. जिल्ह्यात शिवसेनेचे ताकद वाढवलीच सोबत भाजपच्यासमोर तगडे आव्हानही निर्माण केलं आहे.मात्र, उद्धव ठाकरेंची साथ तेलींनी का सोडली? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
भाजपसोडून शिवसेनेत आलेल्या तेली यांनी फक्त आठच महिन्यात शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. या प्रवेशामागे आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कथित अनियमितता आणि चौकशीची शक्यताच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 2021-2022 मधील कर्ज प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आल्याने बँकेने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून चौकशी होण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. या प्रकरणात तेली आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांविरुद्ध नावे समोर आली आहेत. तेली यांच्यासह या सर्वांची चौकशी सुरू होणार असल्याने तसे पत्रही प्राप्त झाले होते.
दरम्यान, बँकेतील अनियमिततेची चौकशी राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचा आरोप तेली यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर केला होता. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तर आपल्याला अशा पद्धतीने कोणतेच चौकशीसाठीचे पत्र आलेले नाही, असेही तेली यांनी म्हटले आहे.
एकीकडे तेली यांच्या पक्ष बदलाचे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कथित अनियमितता आणि चौकशी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करण्याची संधी मिळत नव्हती, असा आरोप केला आहे. शिवाय, त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे संघटना बांधणीची मागणी केली होती. त्याकडे देखील पक्षाने दुर्लक्षित केल्याचा दावा केला आहे.
पक्ष संघटना बांधायला शिवसेनेत वाव आणि संधी नव्हती. याबाबत आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला. जिल्ह्याला एकच जिल्हाप्रमुख नेमवा आणि त्याच्या नेतृत्वात बूथ स्तरावर बांधणी व्हावी, अशी भूमिका मांडली होती. पण दुर्दैवाने शिवसेनेत तसे काहीच झाले नाही. पक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. आणि पुढेही ती मिळेल याची शाश्वती नसल्यानेच आपण पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे तेली म्हणाले.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तेलींनी पक्ष संघटनेबद्दल काही आरोप आणि दावे केलेत. पण त्यांनी ठाकरेंवर टीका करणे टाळले. तसेच कुठलं पद मागितलंच नव्हतं. पण खालच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायला हवं, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे मी कोणावर आणि कुठल्याच पक्षावर नाराज नाही. ती सगळीच मंडळी चांगली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. मुद्दा फक्त काम करण्याची संधीचा होता, असेही आता तेली यांनी म्हटलं आहे.
पक्ष बदलांचा षटकार मारणाऱ्या तेलींनी आता आपण पुन्हा पक्ष बदलणार नसल्याचेही ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी, आता आपण शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय. जो मरेपर्यंत हातात राहील. मी सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहे. आता किमान इथे तरी चांगले काम करण्याची संधी मिळेल, असेही आशावाद व्यक्त केला आहे. तसेच माझे जुने सहकारी निलेश राणे, उदय सामंत, दीपक केसरकर या सगळ्यांबरोबर चांगलं काम करता येईल, असे म्हणत विरोधकांशी मनोमीलनाचे संकेतही दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.