BJP Rajya Sabha Candidates sarkarnama
कोकण

Rajya Sabha Candidates : सुनील तटकरेंविरोधात भाजपची तयारी सुरु; उमेदवार तयार करण्यासाठी कोकणातील खासदार पुन्हा राज्यसभेवर जाणार?

mahavikas aghadi Vs mahayuti : महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी ७ जागांसाठी निवडणूक होत असून यात महायुतीच्या ६ जागा आणि महाविकास आघाडीला १ जागा जाणार आहे.

Aslam Shanedivan

  1. महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यातील ७ दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असून १६ मार्चला राज्यसभा निवडणूक होणार आहे.

  2. शरद पवार यांच्या नावावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  3. भाजपकडून धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा असून पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली आहे.

- वसंत जाधव

Raigad News : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ७ दिग्गज नेते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. या जागांवर पुन्हा १६ मार्चला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. यात महायुतीच्या वाट्याला ६ जागा येणार आहेत, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे.

महायुतीच्या वाट्याला आलेल्या ६ जागांपैकी भाजपचे ४ उमेदवार विजयी होऊ शकणार आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेत जाऊ शकणार आहेत. महाविकास आघाडीकडून अद्यापही ही जागा कोणता पक्ष लढणार? उमेदवार कोण असणार? यासाठी चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी भाजपच्या वाट्याला आलेल्या ४ जागांवर भाजपच्या उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती मिळत आहे.

मंगळवारी (ता.२४) रात्री कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १२ प्रमुख नेत्यांनी बैठक घेत यावर चर्चा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून तब्बल १० ते १२ जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे. यात खासदार धैर्यशील पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा-पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्ह्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात मोठी झेप घेतली होती. यानंतरच आता राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना पाठवण्याची चर्चा पक्ष पातळीवर होताना दिसत आहे.

भाजपचे‘मिशन कोकणा’ला वेग

केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपने देशभर मिशन कमळ आखले. ज्यानंतर राज्यात देखील ‘मिशन कोकण’ला वेग देण्यात आला. 2014 मध्ये प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार कमळ फुलवले. त्यानंतर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. पाठोपाठ राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत धैर्यशील पाटील यांना संधी देत जिल्ह्यात भाजपची स्थिती आणखी भक्कम झाली.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह शेकापचा सुपडा साफ झाला आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही चाचपडताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना व राष्ट्रवादी हे महायुतीत एकत्र असणारे पक्ष एकमेकांची ताकद कमी करण्यावर भर देत आहेत. यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडे लोक जाताना दिसत आहेत.

राजकीय समीकरण

या सगळ्या पार्श्वभूमीवर धैर्यशील पाटील यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करावी, असा एक सूर भाजपमध्ये ऐकायला मिळत आहे. युतीत बिघाड झाल्यास तटकरेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून धैर्यशील पाटलांकडे पाहिले जात आहे. वडील मंत्री, स्वत: दोनदा आमदार आणि आता खासदार राहिल्याने पाटील यांची ताकदही मोठी आहे.

शेकाप पक्षातून भाजप प्रवेश केल्यानंतर पाटील यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेची उमेदवारी दिली होती, पण ती केवळ २ वर्षांचीच टर्म ठरली. आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळेच त्यांना पूर्ण कार्यकाळ मिळावा हा एक हेतू आहे. त्यांना प्रवेश देताना भाजपने पुन्हा राज्यसभेवर पाठवू असाही शब्द दिला असावा अशी ही कुजबूज आहे.

FAQs :

1. राज्यसभा निवडणूक कधी होणार आहे?
१६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

2. कोणत्या आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे?
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे.

3. शरद पवार यांची भूमिका काय असू शकते?
महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर जवळपास अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

4. भाजपकडून किती उमेदवार निश्चित झाले आहेत?
भाजपकडून चार नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.

5. धैर्यशील पाटील यांच्याबाबत काय चर्चा आहे?
त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT