

Rajya Sabha seat allocation Maharashtra 2026: राज्यसभेतील सात जागांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून भाजपला चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षात उत्सुकता शिगेला पोहचली असताना खासदारकीची माळ कोणत्या नेत्यांच्या गळ्यात पडणार? यावरून इच्छुकांत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची प्राथमिक यादी तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुमारे 10 ते 12 संभाव्य नावांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीत काही प्रमुख नेत्यांच्या नावांवर सहमती झाल्याची माहिती पुढे आली असून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 12 वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत राज्यसभेसाठी योग्य समतोल राखत उमेदवारांची निवड कशी करावी, यावर चर्चा झाली.
संभाव्य उमेदवारांच्या यादीत विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. काहींची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी द्यायची का, यावरही विचार सुरू आहे.
या सर्व नावांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लवकरच दिल्लीला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत असल्याने मित्रपक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. प्रितम मुंडे यांचे नावही पुढे आले आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांनी लोकसभा लढवली होती. त्यामुळे या वेळी प्रितम मुंडे यांना राज्यसभेची संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. भागवत कराड यांचाही कार्यकाळ पूर्ण होत असून त्यांना पुन्हा संधी दिली जाते का, याकडे लक्ष लागले आहे.
याशिवाय धैर्यशील पाटील आणि केंद्रीय मंंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून संधी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. एकूणच भाजपमध्ये नावांची चुरस वाढली असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीनंतरच या सस्पेन्सवर पडदा पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.