चिपळूण : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे रामदास कदम यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन शिंदे कदम पिता-पुत्रांना न्याय देणार असल्याची चर्चा आहे. (Shiv Sena Leader Ramdas Kadam Latest News)
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले. या बंडात योगेश कदम सुरवातीला सामील झाले होते. परंतु सर्वात शेवटी गुवाहाटीला गेलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उद्योगखात्याचे मंत्रीपद मिळाले. माजी मंत्री रामदास कदम आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे योगेश कदम यांना राज्य मंत्रिपद तरी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती. परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात योगेश कदम यांचे नाव नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
मला आमदारकी किंवा मंत्रीपद नको, असे रामदास कदम सुरवातीपासून सांगत होते. परंतु राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये रामदास कदम यांचा समावेश करून शिंदे कोकणातील आपला गट अधिक भक्कम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. तसे झाल्यास पुन्हा एकदा कदम पिता-पुत्रांची जोडी विधीमंडळात पाहायला मिळणार आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून रामदास कदम १२ वर्ष विधानपरिषदेचे सदस्य होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी दिली होती. त्यामध्ये रामदास कदम यांचे नाव नव्हते. मागील विधान परिषद निवडणुकीतही कदम यांना डावलण्यात आले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर रामदास कदम अधिक आक्रमकपणे 'मातोश्री' उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर प्रखरपणे टीका करत होते. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून चार नावे विधानपरिषद सदस्य पदासाठी निश्चित झाली आहेत. त्यामध्ये रामदास कदम आणि अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी माझे नाव विधानपरिषद सदस्यपदासाठी सुचवले असले तरी मी विधानपरिषदेत जाण्यास इच्छुक नाही, हे त्यांना मी यापूर्वीच सांगितले आहे. मी आमदार किंवा मंत्री होण्यासाठी शिंदे गटाबरोबर गेलेलो नाही. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मात्र कार्यकर्त्यांची मागणी असल्यास विचार करेन, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.