रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांसाठी दापोली येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, कार्यालय सुरु करण्यासाठी प्रशासनाने तातडीने तयारी सुरु करण्याचे निर्द्रेश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात जावे लागत होते. यासाठी नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत होते. दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर ही गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.
नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर (देवरुख), लांजा आणि राजापूर या 6 तालुक्यांचा कारभार रत्नागिरी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू राहणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना स्थानिक पातळीवर सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दापोली अपर जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनस्तरावरून केली जाणार असून, इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था उपलब्ध मनुष्यबळातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यालयाचे कामकाज तातडीने सुरू करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरत्या जागेची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी जागा निश्चित करून नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करून पुढील 15 दिवसांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे शेतकरी, जमीनधारक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन उपलब्ध झाल्याने महसुली प्रकरणे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.